पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – शहरात एकूण ३ हजार ३४३ मतदान बूथ असून त्यामध्ये पुणे, शिरूर आणि बारामती लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे. पुणे ,शिरूर लोकसभा मतदारसंघाचे पुण्यात एकूण २७२५ केंद्र तर, बारामती मतदारसंघाचे ६१८ बूथ असल्याची माहिती विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिली आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक सात मे रोजी होत आहे. त्यासाठी एकूण ६१८ मतदान केंद्राची पुण्यात तयारी करण्यात येत आहे. यामध्ये पुरंदर तालुक्यात १८७ बूथ, भोर तालुक्यात एक बूथ आणि खडकवासला मतदारसंघात ४३० बूथवर संरक्षणाचे काम पुणे पोलीस पाहत आहे. तर शिरूर मतदार संघात हडपसरमध्ये ५२१ मतदान केंद्र आणि शिरूर परिसरातील १८७ बूथचे काम पुणे पोलिसांकडून पाहण्यात येत आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यामध्ये वडगाव शेरी (४५२ केंद्र) ,शिवाजीनगर (२८०),कोथरूड (३९७), पर्वती (३४४), पुणे कॅन्टोन्मेंट (२७४),आणि कसबा(२७०) यांचा समावेश आहे. सदर मतदारसंघात १३ मे रोजी मतदान पार पडले जाणारे आहे.
एकूण मतदान केंद्राच्या ४० ते ५० टक्के जागी वेबकास्टिंगची व्यवस्था देखील करण्याचे काम सुरू आहे. प्रत्येक बुथवर किमान एक पोलीस सुरक्षेसाठी तैनात असणारा असून त्यासोबतच पोलिसांची गस्त पथक देखील वाॅच ठेवणार आहेत.
मतदान केंद्रावर ईव्हीएम पोहोचवण्यच्या व्यवस्थेची तयारी सुरू करण्यात आली आहे. पुण्यातील शासकीय गोदामात योग्य त्या संरक्षणात ईव्हीएम सीलबंद केल्या आहेत. पुणे पोलीस आयुक्तालय हद्दीत १९२ बूथला पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांनी आतापर्यंत भेट दिलेली आहे. ज्या मतदान केंद्रावर मागील वेळी कमी मतदान, किंवा अन्य गैरप्रकार घडले, तेथे विशेष लक्ष ठेवले जात आहे.