खरेदी वाढल्याने शेअरबाजार निर्देशांकांची आगेकूच

टीसीएसचे शेअर वधारले; मात्र इन्फोसिस कंपनीचे शेअर पिछाडीवर

मुंबई – गेल्या आठवड्यात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रमुख कंपन्या टीसीएस आणि इन्फोसिसने आपले ताळेबंद जाहीर केले होते. त्या ताळेबंदाच्या आधारावर सोमवारी टीसीएस कंपनीचे शेअर पाच टक्‍क्‍यांनी उसळले तर इन्फोसिस कंपनीच्या शेअरच्या भावात बरीच घट झाली.

सोमवारी सकारात्मक वातावरणामुळे शेअरबाजार निर्देशांक बऱ्यापैकी वाढले. सोमवारी बाजार बंद होताना मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 138 अंकांनी म्हणजे 0.36 टक्‍क्‍यांनी वाढून 38,905 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 46 अंकांनी वाढून 11,690 अंकांवर बंद झाला.टीसीएसचा कंपनीचा शेअर बऱ्याच प्रमाणात वाढल्यामुळे त्याचा मुख्य निर्देशांकांना चांगलाच आधार मिळाला.

सोमवारी शेअरबाजारात धातू, वाहन, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या शेअरच्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात बरीच वाढ झाली असल्याचे दिसून आले. इन्फोसिसने बऱ्यापैकी नफा मिळविला असला तरी आगामी काळात महसूल आणि नफ्यात फारशी वाढ होणार नसल्याचे सांगितल्यामुळे इन्फोसिस कंपनीचा शेअर सोमवारी 2.83 टक्‍क्‍यांनी कमी झाला.

दरम्यान शुक्रवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 897 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली तर देशातील संस्थाना गुंतवणूकदारांनी 15 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केल्याची आकडेवारी शेअरबाजारांनी जारी केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर आज कमी होऊन 71 डॉलर प्रति पिंपावर आले. तर रुपयाचे मूल्य 19 पैशांनी घसरून प्रति डॉलरला 69 रुपये 36 पैसे झाले.

सध्या निवडणुकांचा हंगाम चालू असल्यामुळे गुंतवणूकदार सावध राहण्याची शक्‍यता आहे. तसेच दुपारी घाऊक किमतीवर आधारित महागाईची आकडेवारी जाहीर झाली. त्यानुसार महागाईत वाढ झाली आहे. मात्र तरीही त्याकडे दुर्लक्ष करून गुंतवणूकदारांनी खरेदी केल्यामुळे निर्देशांकात वाढ झाली.

आजच्या घटनाक्रमाबाबत बोलताना जीओजी वित्तीय सेवा या संस्थेचे विनोद नायर यांनी सांगितले की, क्रूडचे वाढत असलेले दर चिंतेचा विषय असून त्याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष राहणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.