23 उमेदवारांच्या विरोधातील गंभीर गुन्हे
मुंबई – महाराष्ट्रातील लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यातील दहा लोकसभा मतदारसंघातील 178 उमेदवारांपैकी 38 उमेदवारांची गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी असल्याचे समोर आले आहे. यापैकी 23 उमेदवारांच्या विरोधातील गुन्हे हे गंभीर स्वरूपाचे आहेत, अशी माहिती “महाराष्ट्र इलेक्शन वॉंच-एडीआर’ या संस्थेने दिली आहे.
महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यासाठी 18 एप्रिल रोजी मतदान होत आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये बुलढाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर आणि सोलापूर अशा दहा मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघातील उमेदवारांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास करीत “महाराष्ट्र इलेक्शन वॉंच-एडीआर’ संस्थेने निष्कर्ष नोंदवले आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या 9 पैकी 4, बहुजन समाज पक्षाच्या 7 पैकी 3, शिवसेनेच्या पाचपैकी 4, कॉंग्रेसच्या पाचपैकी 3 आणि राष्ट्रवादीच्या चारपैकी 3 उमेदवारांच्या विरोधात गुन्हेगारी प्रकरण दाखल असल्याचे संस्थेने म्हटले आहे.
संस्थेने आपल्या अहवालात निवडणूक लढवत असलेल्या 10 श्रीमंत उमेदवारांची माहिती दिली आहे. या पहिल्या दहा श्रीमंत उमेदवारांच्या यादीत कॉंग्रेसचे नांदेडचे उमेदवार अशोक चव्हाण हे दुसऱ्या क्रमांकावर, सुशीलकुमार शिंदे चौथ्या, तर भाजपच्या डॉ. प्रीतम मुंडे आठव्या क्रमांकावर आहेत.