शाहूपुरीवासीयांचा दोन्ही राजांना विजयी करण्याचा निर्धार

भाजपमुळे शाहूपुरीतील सर्व समस्या सुटतील – सौ. वेदांतिकाराजे भोसले

सातारा –
भाजप, शिवसेना व मित्रपक्षांच्या महायुतीचे सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि सातारा-जावळी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्यासमवेत कार्यकर्त्यांनी शाहूपुरीत महिला मेळावा घेतला आणि घरोघरी प्रचार केला.

महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत “सबका साथ, सबका विकास’चा नारा दिला आणि दोन्ही राजांना मताधिक्‍याने विजयी करण्याचा निर्धार केला. भाजपच्या माध्यमातून शाहूपुरी भागातील सर्व समस्या सुटतील, असा विश्‍वास सौ. वेदांतिकाराजे यांनी व्यक्त केला.

कर्तव्य सोशल ग्रुपच्या संस्थापिका सौ. वेदांतिकाराजे, सौ. सुवर्णा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शाहूपुरीत गडकर आळी, श्रीस्वामी समर्थ मंदिर परिसर, रांगोळे कॉलनी, जयविजय कॉलनी, मोळाचा ओढा, तामजाईनगर, पिलेश्‍वरीनगर, दौलतनगर येथे झालेल्या महिला मेळाव्यास जोरदार प्रतिसाद मिळाला.

सौ. वेदांतिकाराजे म्हणाल्या, सातारा तालुक्‍यातील विविध प्रश्‍न शिवेंद्रराजेंच्या माध्यमातून मार्गी लागले आहेत. पक्ष बदलामागची भूमिका ही फक्त मतदारसंघाच्या विकासाची आहे. विरोधकांकडून सुरू असलेल्या अपप्रचाराकडे लक्ष न देता शाहूपुरीचा विकास कोणी केला आणि यापुढे कोणाच्या माध्यमातून विकास होणार आहे, याचा विचार नागरिकांनी करावा. दोन्ही राजांना भरघोस मतांनी निवडून द्यावे.

याप्रसंगी काही महिलांनी मांडलेल्या शंकांचे निरसन सौ. वेदांतिकाराजे यांनी केले. भविष्यात आपल्या मूलभूत प्रश्‍नांना न्याय मिळयचा असेल तर उदयनराजे व शिवेंद्रराजेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे व मतांच्या रूपाने ताकद उभी कराल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.

भारत भोसले, रामदास धुमाळ, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य निर्मला दुधाणे, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ जाधव, सुहास ओहाळकर, शोभा केंडे, माधवी शेटे, नीलम देशमुख, माजी सरपंच सौ. रेश्‍मा गिरी, माजी उपसरपंच विकास देशमुख, सतीश सूर्यवंशी, सौ. संगीता देशमुख, राजेंद्र केंडे, सत्यवान किर्दत, निखिल प्रभाळे, संतोष किर्दत, आप्पा गोसावी, कमलाकर जाधव, निशांत केंडे, तुषार जोशी, सुरेश चव्हाण, विजय गार्डे, सुनीता पाटणे उपस्थित होत्या.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)