कामगार आयुक्तांच्या बैठकीत निर्णय : शहरात उद्यमनगर, संभाजीनगर कामगार केंद्रांची निवड
पिंपरी – कामगार कल्याण मंडळाच्या वतीने राज्यभरातील कामगार व त्यांच्या कुटुंबियांसाठी कामगार कल्याण मंडळाच्या केंद्रांवर दवाखाने सुरू करण्याचा निर्णय कामगार आयुक्तांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. राज्यात प्रथमच पिंपरी-चिंचवडमधील उद्यमनगर, संभाजीनगर आणि पुण्यातील सहकारनगर या कामगार केंद्रांवर दवाखाने सुरू केले जाणार आहेत. त्याबाबतचा निर्णय नुकत्याच झालेल्या बैठकीत घेतला आहे, अशी माहिती गुणवंत कामगार परिषदेच्या अध्यक्षा भारती चव्हाण यांनी दिली.
कामगार कल्याण निधी नियोजन आणि अंमलबजावणी करण्याबाबतची बैठक नुकतीच पुण्यातील सहकारनगर येथील केंद्रावर झाली. त्या प्रसंगी हा निर्णय घेण्यात आला. कामगार कल्याण आयुक्त महेंद्र तायडे, भारती चव्हाण, कामगार कल्याण सहायक आयुक्त घन:श्याम कुळमेथे, अर्थ विभागाचे लेखा अधिकारी रविंद्र टोणपे, कायदा विभागाचे प्रशासन अधिकारी जितेंद्र पाटील, पुणे विभागाचे कामगार कल्याण अधिकारी समाधान भोसले, कामगार प्रतिनिधी राज अहिरराव, तानाजी एकोंडे, संजय गोळे, आण्णा जोगदंड आदी कोअर कमिटी सदस्य या बैठकीला उपस्थित होते.
सद्य:परिस्थितीत कामगारांकडून 12 टक्के, मंडळाच्या वतीने 24 टक्के व शासनाच्या वतीने 36 टक्के अशा प्रमाणात कामगार कल्याण निधी जमा करण्यात येतो. तो सुधारित करून कामगारांच्या वतीने 24 टक्के, मंडळातर्फे 48 टक्के व शासनाकडून 72 टक्के करावा, असा प्रस्ताव राज्य शासनाला यापूर्वीच सादर केलेला आहे. त्याचा पाठपुरावा करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. या प्रस्तावाची अंमलबजावणी झाल्यास कामगार कल्याण मंडळास दुप्पट निधी उपलब्ध होईल. या निधीमुळे कामगारांच्या व विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत दुप्पट वाढ करता येईल. शिष्यवृत्ती पाचवीपासून देण्याचे नियोजन आहे. याबाबतही प्रस्ताव सादर केला आहे. तसेच कामगारांना देण्यात येणाऱ्या पुरस्कार रकमेत, दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठी मिळणाऱ्या रकमेत वाढ करता येईल.
पिंपरीतील अण्णासाहेब मगर स्टेडियमच्या बदल्यात पर्यायी जागा आणि निधी मिळण्याबाबत पाठपुरावा करावा. तसेच, वेळप्रसंगी कायदेशीर कार्यवाही करावी, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. तळेगाव दाभाडे येथे केंद्र सुरू करणे, कामगार साहित्य संमेलन, गुणवंत कामगार परिषद, कामगार दिंडी आणि कामगार मॅराथॉन स्पर्धा आदी उपक्रम पुन्हा चालू करावे, असे बैठकीत ठरले.