पीएमपी प्रशासनाला सूचना : कारभार सुधारा, आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हा
पिंपरी – पिंपरी-चिंचवडमध्ये सार्वजनिक बससेवा पुरविणाऱ्या पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) कंपनीने आपला कारभार सुधारावा. तसेच, आर्थिकदृष्ट्या सक्षम होवून महापालिकांवर अवलंबून न राहता स्वनिर्भर व्हावे, अशा सूचना पिंपरी महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी पीएमपी अधिकाऱ्यांना दिल्या.
पिंपरी महापालिकेत मंगळवारी (दि.10) झालेल्या बैठकीला महापौर माई ढोरे, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, उपमहापौर तुषार हिंगे, आयुक्त श्रावण हर्डीकर, पीएमपीच्या अध्यक्षा नयना गुंडे यांच्यासह संबधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैठकीमध्ये पीएमपीच्या बसेसची संख्या वाढली असून सध्या 2183 बस मार्गांवर धावत आहेत. येत्या काही दिवसांत यामध्ये इ- बस, सीएनजी आणि डिझेलवर चाजणाऱ्या बसची भर पडणार आहे. त्यामुळे फेऱ्यांमध्ये आणखी भर पडेल.
सध्या पीएमपीकडे 80 एकर जागा असून पुण्यात 58 आणि पिंपरी-चिंचवडमध्ये 22 एकर जागा आहे. मात्र, पीएमपीला पुण्यात आणखी 45 एकर, तर पिंपरी-चिंचवडमध्ये 47 एकर जागेची गरज असल्याचे पीएमपी प्रशासनाने पालिकेच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले. सध्या रावेत, चऱ्होली, वाकड, मोशीत त्यांना जागा दिल्या जात आहेत. तेथे पालिकेकडून डेपो बांधून देण्याची मागणी पीएमपीने केली. मात्र, पदाधिकाऱ्यांनी पीएमपी दोन्ही पालिकांवर अवलंबून आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात निधी द्यावा लागतो. ही कंपनी सक्षम कधी होईल? यासाठी कारभार सुधारावा लागणार आहे. रस्त्यावर सेवा पुरविता त्रृटी आढळल्यास संबधित डेपो मॅनेजरपासून, चालक, वाहकांवर वेळोवेळी कारवाई करावी. तसेच, चांगले काम करणाऱ्यांना सन्मानित करावे. शिस्त लावून कारभार सुधारल्यास बसेसवा सुधारेल. तसेच, जाहिरातीच्या माध्यमांतून उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करण्याच्या सूचनाही पदाधिकाऱ्यांनी केल्या.
विरोधकांना ठेवले बैठकीपासून दूर
पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अधिकारी व पालिका अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक पदाधिकाऱ्यांनी घेतली. परंतु, या बैठकीला सत्ताधारी भाजपचे महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, उपमहापौर होते. मात्र, या बैठकीला विरोधकांपैकी विरोधी पक्षनेते आणि कोणत्याच पक्षाचे गटनेते उपस्थित नव्हते. त्यामुळे महापालिकेत प्रशासकीय बैठकांना विरोधकांना वारंवार दूर ठेवले जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
वाहकांना इन्सेंटिव्ह द्या
अधिकाधिक उत्पन्न मिळाविणाऱ्या वाहकांसाठी इन्सेंटिव्हची योजना चालू करण्याची सूचना यावेळी स्थायीचे अध्यक्ष विलास मडिगेरी यांनी केली. प्रत्येक मार्गावर बसच्या उत्पन्नाचे कमीत कमी आणि जास्तीत जास्तचे निकष ठरवावेत. त्यापेक्षा अधिक उत्पन्न आणणाऱ्या वाहकांना इन्सेंटिव्ह दिल्यास उत्पन्नात भर पडेल, असेही मडिगेरी सांगितले.