पिंपरी -वाढदिवसानिमित्त फेसबुकवर टाकलेली एक पोस्ट सराईत गुन्हेगाराला चांगलीच महागात पडली. या पोस्टमुळे वाढदिवस पोलीस कोठडीत काढावा लागला.
अजय विलास काळभोर (वय 27, रा. आडवाणी कंपनीच्या मागे, चिंचवड), अनिल प्रशांत सोनावणे (वय 24, रा. विद्यानगर, चिंचवड) आणि सोमनाथ राजू देवाडे (वय 21, रा. चिंचवड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी अजय काळभोर याचा वाढदिवस असल्याने सकाळी अकरा वाजताच्या सुमारास त्याने “कुछ दिन और सही, बहोत बडा धमाका होगा, पूरे पिंपरी चिंचवड मे अपनाही नाम होगा’, अशा आशयची पोस्ट त्याने फेसबुकवर टाकली. तसेच त्याचा साथीदार प्रशांत सोनावणे यानेही त्याला शुभेच्छा देताना “भाऊ आमचा, बाप तुमचा’ पोस्ट टाकली. तर आरोपी देवाडे हा अजय काळभोर याचे फेसबुक अकाऊंट हाताळत होता.
पोलिसांची सोशल मीडियावर विशेषतः गुन्हेगारी वृत्तीच्या सराईतांवर नजर असल्याने या दोन्ही पोस्टबाबतची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे आणि गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांना मिळाली. त्यांनी सराईत गुन्हेगार आणि त्याला शुभेच्छा देणाऱ्या प्रशांत सोनावणे यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त प्रशांत अमृतकर यांना दिले. अमृतकर यांच्या सूचनांनुसार गुंडा विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक हरीश माने यांनी या गुंडांना अटक केली.
तीनही आरोपींना बुधवारी अटक केली. गुरुवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले. न्यायलयाने त्यांना चांगल्या वागणुकीची हमी घेत जामिनावर सोडून दिले. मात्र महिनाभर तीनही आरोपींना निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येण्यास मनाई केली. सोशल मीडियावरील पोस्टवरून पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.