पिंपरी (प्रतिनिधी) – गुढीपाडव्यानिमित्त साखरगाठी हाराच्या मागणीत गेल्या वर्षीपेक्षा दुप्पट वाढ झाली आहे. करोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून हा व्यवसाय थंडावला होता. आता यंदा पुन्हा चांगली मागणी वाढली आहे. त्यामुळे व्यावसायिकांची चिंता मिटली आहे. गुढीपाडवा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यासाठी होळीनंतर गाठीहार विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल झाले. करोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून या व्यवसायावर मोठा परिणाम झाला होता. गतवर्षी गाठीहार बनविणाऱ्या विक्रेत्यांनी करोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता कमी गाठीहार बनविले होते.
तसेच गतवर्षी गाठीहारांच्या मागणीत 50 टक्के घट झाली होती. मात्र, यंदा करोनाची साथ नियंत्रणात आहे. पर्यायाने, गाठीहार बनविणाऱ्यांनाही यंदा चांगली मागणी लक्षात घेता त्यानुसार मोठ्या प्रमाणात गाठीहार बनविले आहेत. पांढरा, केशरी, पिवळा आणि गुलाबी अशा विविध रंगातील गाठीहार सध्या बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झाले आहेत. 90 रुपयांपासून 120 रुपये किलोपर्यंत गाठीहार विक्रीसाठी उपलब्ध आहेत.