सलग पाचव्या दिवशी श्रीगनरचे विमानतळ बंद
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी सुरू आहे. त्यामुळे इथले जनजीवन विस्कळित झाले आहे. त्यातच आता येत्या 48 तासांसाठी दोन्ही राज्यात हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येत्या 48 तासांमध्ये राज्यात मुसळधार पाऊस आणि हिमवृष्टीचा इशारादेखील हवामान विभागाने दिला आहे.
राज्यात देण्यात आलेल्या ऑरेंज अलर्टच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचे आदेशदेखील देण्यात आले आहे. राज्यात श्रीनगर-लेह राष्ट्रीय महामार्गासोबत पुंछ आणि राजोरी जिल्ह्याला जोडणारा मोगल रस्तादेखील बर्फवृष्टीमुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. पुरेसा प्रकाश नसल्याने श्रीगनर आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सलग पाचव्या दिवशी सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. बुधवारी झालेल्या हिमवृष्टीमुळे बांदीपोरा येथील सीमा कसबा गुरेझ, कुपवाडामधील कर्नाह आणि तंगधार येथे संपर्क मार्ग बंद करण्यात आले.
जम्मू-श्रीनगर महामार्गावर एकतर्फी वाहनांना सकाळी परवानगी देण्यात आली होती. जम्मू, काश्मीर आणि लडाख या डोंगराळ भागांसह सोनमर्ग, पहलगाम, गुलमर्ग, मोगल रोड, जोजिला पास, साधना टॉप, राजधानी पास, कारगिल, द्रास येथेदेखील मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी झाली आहे. हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन बर्फ हटविण्यासाठी काश्मीरमध्ये 44 स्नो क्लीयरन्स मशीन्स बसविण्यात आल्या आहेत.