मृत्यू ओढावल्यास पालिका देणार एक कोटी
पुणे – करोनाला अटकाव घालण्याऱ्या वैद्यकीय तसेच इतर सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांना सुरक्षा कवच लागू करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयानुसार महापालिका कर्मचारी, अधिकारी, डॉक्टर, परिचारिका आदींचा करोनामुळे मृत्यू झाल्यास संबंधितांच्या वारसांना एक कोटी रुपये किंवा महापालिकेच्या सेवेत वारसाला नोकरी हवी असल्यास त्यांना पैसे आणि नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.
शहरात करोनाच्या साथीचे रूग्ण वाढण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे प्रसार रोखणे, रुग्णांवर उपचार करणे, रुग्णांचे विलगीकरण करणे, सर्वेक्षण करणे आदी कामांसाठी वैद्यकीय विभागाकडील कर्मचारी, डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, सेवक, शिक्षक, लेखनिक आदींचा करोनाबाधित रुग्णांशी संपर्क येत असल्याने त्यांना सुरक्षाकवच पुरविण्याची मागणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्याकडे केली.
आयुक्तांनी याची गंभीर दखल घेत करोनाशी संदर्भातील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना लागण होऊन मृत्यू झाल्यास एक कोटी पर्यंतची मदत देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. या निर्णयानुसार, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना केंद्राने 50 लाखांची मदत जाहीर केली असून त्यात महापालिका आणखी 50 लाखांचा निधी देणार आहे.