आंबेठाण – श्रीक्षेत्र महाळुंगे इंगळे (ता. खेड) या गावाने गावामध्ये अनोखे उपक्रम राबवून इतरांसमोर आदर्श ठेवला आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. असे असताना गावातील तलाठी श्याम वालेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील लोकांनी एकत्र येऊन गरीब व गरजू लोकांसाठी स्वतः जेवणाची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला.
भाडेकरूंकडून अनेकांनी एक महिन्याचे भाडे न घेण्याचा निर्णयसुद्धा घेतला. प्रांताधिकारी संजय तेली यांनी गावाला भेट देऊन गावातील परिस्थितीचा आढावा घेतला व प्रशासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन ग्रामस्थांना दिले. आपल्या रूममधील कोणताही भाडेकरू उपाशी राहणार नाही याची जबाबदारी रूम मालकाने घेतली आहे.
त्याचप्रमाणे गावातील सर्व डॉक्टर्स त्यांना बोलावून गावातील सर्व दवाखाने चालू ठेवण्याचा निर्णय झाला. वैद्यकीय सेवेमध्ये कुठलाही खंड पडणार नाही याची जबाबदारी गावकऱ्यांनी घेतली. गावातील काही तरुणांनी स्वयंसेवक म्हणून काम पाहण्याचा निर्णय घेतला आहे. व्हॉट्सऍप ग्रुप तयार करून त्यामध्ये पोलीस निरीक्षक यांना ग्रुपमध्ये घेतले आहे.
यावेळी ग्रामसेवक परासूर, सरपंच कल्पना कांबळे, उपसरपंच योगेश महाळुंगकर, काळूराम महाळुंगकर, शिवाजी वर्पे, पोलीस पाटील सचिन भोपे, सुनील मिंडे, विशाल भोसले, आबा तुपे, चिंधाभाऊ महाळुंगकर, पत्रकार राजेंद्र सुरसे, किरण शिवले यांसह सर्व डॉक्टर्स उपस्थित होते.