नवी दिल्ली – संसदेच्या उद्यापासून सुरू होणाऱ्या अधिवेशनात कॉंग्रेस पक्ष देशातील वाढती महागाई, बेरोजगारी, आणि युक्रेन मधून भारतीयांना बाहेर काढण्यात झालेली दिरंगाई असे विषय उपस्थित करणार आहे अशी माहिती राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आज दिली.
संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा उद्यापासून सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आज सकाळी पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली संसदीय कार्यकारीणीची बैठक त्यांच्या निवासस्थानी झाली. त्यात हे विषय लाऊन धरण्याचे ठरले असे खरगे म्हणाले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा 8 एप्रिल पर्यंत चालणार आहे.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा 11 फेब्रुवारीला संपला होता. पाच राज्यांतील निवडणुकांमध्ये कॉंग्रेसचा पराभव झाल्याने पक्षात आता फार जोष उरलेला नसला तरी संसदेच्या अधिवेशनात जनतेशी निगडीत विषय जोरदारपणे लाऊन धरण्याचे धोरण पक्षाने आखले आहे.