मुंबई – अमेरिकेतील महागाई कमी होऊन जून महिन्यात व्याजदर कपात होईल असा आशावाद जागतिक पातळीवर पसरला होता. मात्र मार्च महिन्यात अमेरिकेतील किरकोळ किमतीवर आधारित महागाई उच्च पातळीवर राहिल्यामुळे सर्व समीकरणावर परिणाम झाला आहे. ज्येष्ट बंकर उदय कोटक यांनी म्हटले आहे की, आता अमेरिका व्याज दरकपात लांबणीवर टाकेल. दरम्यानच्या काळामध्ये खनिज तेलाचे दर 90 डॉलरपेक्षा जास्त आहेत. अशा परिस्थितीत जागतिक पातळीवर महागाईचा दर प्रदीर्घ काळ जास्त पातळीवर राहू शकतो. त्याचा परिणाम भारतावरही होणे साहजिक आहे.
समाज माध्यमावर जारी केलेल्या एका टिपणात उदय कोटक यांनी म्हटले आहे की, यावर एकच आशेचा किरण आहे. तो म्हणजे चीनची अर्थव्यवस्था. जर चीनची अर्थव्यवस्था या महिन्यात अधिक गतीने वाढण्याची लक्षणे निर्माण झाली तरच हा नकारात्मक परिणाम काही प्रमाणात कमी होऊ शकतो.
अमेरिकेत मार्च महिन्यातील किरकोळ किमतीवर आधारित महागाई वाढून 3.5% वर गेली आहे. गेल्या महिन्यात ती 3.2% होती. ही महागाई कमी होण्याऐवजी वाढल्यामुळे आता अमेरिकेत जूनमध्ये व्याजदर कपात होणे अशक्य आहे. त्याऐवजी डिसेंबरमध्ये अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणूका होत असताना व्याजदर कपात होऊ शकेल. दरम्यानच्या काळामध्ये खनिज तेलाचे दर 90 डॉलर पर्यंत वाढले आहे. अशा परिस्थितीत अमेरिका व्याजदर कपात करणार नाही. त्यामुळे इतर देशातील बँकाही व्याजदर कपात करणार नाहीत. याचा जागतिक आर्थिक परिस्थितीवर बराच परिणाम होऊ शकतो असे कोटक यांना वाटते.
मार्च महिन्यात अमेरिकेत महागाई वाढल्याची आकडेवारी जाहीर झाल्यानंतर त्याचा नकारात्मक परिणाम अमेरिकेतील शेअर बाजारावर झाला. वॉल स्ट्रीट वरील निर्देशांक बरेच घसरले आहेत. त्याचबरोबर डॉलर वधावरून अमेरिकेच्या दोन आणि दहा वर्षाच्या कर्जरोख्यावरील परतावा वाढला आहे.
अमेरिकेत वाढलेल्या महागाईनंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडे यांनी सांगितले की, एकेकाळी अमेरिकेतील महागाई 9% होती. मात्र आम्ही प्रदीर्घ काळ उपाययोजना करून ती सध्या तीन टक्क्यावर आणली आहे. आगामी काळात ती आणखी कमी करण्यासाठी आमच्याकडे उपाययोजना आहेत.