Lok Sabha Election 2024 | Voting | Second Phase – लोकसभा निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्यासाठी आज १३ राज्यांमधील ८८ जागांवर मतदान पार पडत आहे . त्यामुळे कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासह १ हजार २०६ उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (इव्हीएम) बंद होईल.
दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील ८ मतदारसंघ मतदान प्रक्रियेला सामोरे जात आहेत. बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी हे ते मतदारसंघ आहेत. महाराष्ट्रात दुसऱ्या टप्प्यात २०४ उमेदवारांचे भवितव्य ठरेल.
केरळमधील सर्व २० जागांवर उद्या मतदान होईल. त्या राज्यातील वायनाडमधून राहुल सलग दुसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. केरळमधल्याच थिरूवनंतपूरममधून कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर आणि भाजपचे उमेदवार असणारे केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर एकमेकांविरोधात नशीब आजमावत आहेत.
कर्नाटकमधील १४, राजस्थानमधील १३, उत्तरप्रदेशातील ८, मध्यप्रदेशातील ६ मतदारसंघही मतदानासाठी सज्ज झाले आहेत. त्याशिवाय, आसाम आणि बिहारमधील प्रत्येकी ५, पश्चिम बंगाल आणि छत्तीसगढमधील प्रत्येकी ३ जागांवर मतदान होईल. मणिपूर, त्रिपुरा आणि जम्मू-काश्मीरमधील प्रत्येकी १ मतदारसंघ त्या प्रक्रियेला सामोरा जाईल.