कोलकाता – ज्येष्ठ अभिनेते आणि माजी केंद्रीय मंत्री शत्रूघ्न सिन्हा आणि बाबूल सुप्रियो प. बंगालमध्ये अगामी पोटनिवडणुकीत तृणमूलकडून लढतील, असे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रविवारी जाहीर केले. सिन्हा असनसोल लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवतील तर सुप्रियो बाल्लीगंज विधानसंघातून पोट निवडणूक लडवतील, असे स्पष्ट करण्यात आले.
अखिल भारतीय तृणमूल कॉंग्रेसच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री आणि प्रख्यात अभिनेते शत्रुघ्न सिन्हा हे असनसोल मतदार संघातून निवडणूक लढवतील तर माजी केंद्रीय मंत्री आणि गायक बाल्लीगंज विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीत आमचे उमेदवार असतील, असे ट्विट ममता बॅनर्जी यांनी केले आहे.
सप्टेंबर महिन्यात सुप्रियो यांनी भाजपला रामराम करून तृणमूलमध्ये प्रवेश केला होता. त्यांना मंत्री पदावरून हटवल्यानंतर त्यांनी हे पक्षांतर केले होते. त्यावेळी कठोर परिश्रम आणि उत्तम काम करून हे घडल्याने त्यांनी निराशा व्यक्त केली होती.
शत्रुघ्न सिन्हा यांनी 2019मध्ये निवडणुकीपुर्वी भाजपातून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांचा बालेकिल्ला असणाऱ्या पाटना साहीब मतदार संघात भाजपाच्या रवी शंकर प्रसाद यांनी त्यांचा पराभव केला होता. निवडणूक आयोगाने चार मतदारसंघात पोटनिवडणूक 12 एप्रिल असल्याचे जाहीर केले होते. त्यात असनसोल आणि बाल्लीगंजचा समावेश होता.