मुंबई – राज्यात करोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद असल्या तरी शालेय शिक्षण विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी अनेक प्रयत्न करण्यात येत आहेत. शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरू राहण्यासाठी विविध माध्यमांमधून प्रयत्न केले जात आहेत.
ज्या शिक्षकांना करोना ड्युटी आहे त्या शाळांमधील मुख्याध्यापकांनी पर्यायी शिक्षकांची व्यवस्था उपलब्ध करणे, एकावेळी शाळेतील सर्वच शिक्षकांना ड्युटी न लावता शिक्षक उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
“शाळा बंद… पण शिक्षण आहे.’ या अभ्यासमालेच्या सहाय्याने दीक्षा ऍप आधारित विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययन करण्यासाठीचा उपक्रम 3 महिन्यांपासून सुरू करण्यात आला आहे. यात विद्यार्थ्यांसाठी स्वयंशिक्षणासाठी पर्यायी शैक्षणिक दिनदर्शिका विकसित करण्यात आली आहे.
जिओ टीव्हीवर चार माध्यमांमधून विद्यार्थ्यांसाठी इ. तिसरी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक कार्यक्रम प्रसारित करण्यात येत आहेत. “जिओ सावन’ या रेडिओ वाहिनीवर देखील कार्यक्रम प्रसारित करण्यात येत आहेत. याशिवाय यु ट्यूबवर विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचे व्हिडीओ चॅनल सुरू करून त्यावर व्हिडीओ अपलोड करण्यात आले आहेत. डीडी सह्याद्री वाहिनीवर “टीलीमिली’ हा शैक्षणिक कार्यक्रमातून इ. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मार्गदशन करण्यात येत आहे.
शिक्षकांना घरातून विद्यार्थ्यांना अध्यापन करता यावे यासाठी गुगल क्लासरूमची सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. स्वयंसेवक, शिक्षक वाडीवस्त्यांना भेटी देऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करत आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण विभागाने दिली आहे.