Lok Sabha Election 2024 – महाविकास आघाडी महाराष्ट्रातील पहिल्या 2 टप्प्यांतील लोकसभेच्या 13 पैकी 10 जिंकेल, असा ठाम विश्वास शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शुक्रवारी व्यक्त केला. ते शिर्डीत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांनी फोन टॅपिंग प्रकरणात भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तुरुंगात जाण्याची भीती वाटत असल्याचा दावाही केला. (Lok Sabha Election 2024, Sanjay Raut Said Mahavikas Aghadi to win 10 out of 13 seats in two phases)
शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघाचे उमेदवार अनिल देसाई यांनी शिर्डी साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत खासदार संजय राऊत होते. तिथे पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत यांनी लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या 2 टप्प्यांतील 10 जागा महाविकास आघाडी जिंकणार असल्याचा दावा केला. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकसभा निवडणुकीत राजकारणात कुठेही दिसणार नसल्याचेही स्पष्ट केले.
यावेळी राउतांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नखशिखांत भ्रष्टाचारी माणूस असल्याचाही आरोप केला. देवेंद्र फडणवीस केसापासून पायांच्या नखापर्यंत भ्रष्टाचारात बुडालेत. त्यांना आता तुरुंगात जाण्याची भीती वाटत आहे. तुम्ही सत्तेत असताना फोन टॅपिंग केले. त्यामुळे आता मी नाही त्यातली अन् कडी लावा आतली असे कसे चालेल, असे ते म्हणाले.
घटनात्मक संस्थांची फेररचना करण्याचे संकेत –
इंडिया आघाडीचे केंद्रात सरकार आल्यानंतर घटनात्मक संस्थांची फेररचना करण्याचे संकेतही संजय राऊत यांनी यावेळी दिले. निवडणूक आयोग ही भाजपची शाखा आहे. अतिरिक्त शाखा असणाऱ्या आयोगाकडून आता निष्पक्ष कामाची अपेक्षा करणे चुकीचे आहे. उद्या केंद्रात आमचे सरकार येईल. त्यानंतर घटनात्मक संस्थांची फेररचना केली जाईल. या संस्था सध्यासारख्या राजकीय हस्तक्षेप न करता काम करतील हे आम्ही पाहू, असे संजय राऊत उपमुख्यमंत्री अजित पवारांना ‘कचाकच बटन दाबा’ या प्रकरणात निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या क्लिनचीट प्रकरणावर भाष्य करताना म्हणाले.