पुणे – दोन तरुणांनी चेष्टा मस्करीतून एका व्यक्तीच्या पायावर पेट्रोल टाकून जळती काडी टाकली. यामध्ये आगीने भडका घेऊन पाय पुर्णपणे जळाला. शेजारील नागरिकांनी पायावर गोधडी टाकल्याने त्याचा जीव बालंबाल बचावला. याप्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बापु जालिंदर खिलारे यांनी दिलेल्या तक्रारीनूसार शुभम पवार आणि मयुर भुंबे (रा.सहकारनगर) यांच्या विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी आणि आरोपी एकाच वस्तीमध्ये रहाण्यास आहे. फिर्यादी बापु कामावरुन घरी जात असताना त्यांच्या वस्तीतील एका मुलाच्या दुचाकीच्या टाकीत पाणी घुसले होते. तो ते पाणी गाडी आडवी करुन काढत होता. टाकीतील पेट्रोल त्याने बाटलीत काढून ठेवले होते.
यावेळी शेजारी उभ्या असलेल्या शुभम आणि मयुरने बापु यांच्याबरोबर चेष्टामस्करी करत पेटकी काडी पायावर टाकली. मात्र त्यांना काहीच न झाल्याने त्यांनी बाटलीतील पेट्रोल पायावर टाकून पुन्हा पेटती काडी पायावर टाकली. यामुळे पायावरील पेट्रोलने पेट घेतला. ही घटना पहात असलेल्या एका मुलीने तातडीने घरातील गोधडी आणून त्यांच्या पायावर टाकली. यामुळे आग विझली. या घटनेत बापु यांचा पाय मात्र भाजला गेला. याप्रकरणाचा तपास पोलीस हवालदार एस.के.जोशी करत आहेत.