२१ जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह
सातारा (प्रतिनिधी)– जिल्ह्यातील ६८ संशयितांना रविवारी विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले. तर २१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातील ५, कृष्णा मेडिकल कॉलेजमधील १४, फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयामधील २ अशा एकूण २१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात ११ व कराडच्या उपजिल्हा रुग्णालयात ५७ अशा एकूण ६८ नागरिकांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालयात दाखल असणाऱ्या एका करोना बाधित रुग्णाचे १४ दिवसानंतर तपासणीसाठी पाठविण्यात आलेला पहिला नमुना निगेटिव्ह आल्याने दुसरा नमुना बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाकडे तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे.
कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये दाखल असणाऱ्या एका करोनाबाधित रुग्णाचे १४ दिवसानंतर तपासणीसाठी पाठविण्यात आलेला पहिला नमुना निगेटिव्ह आल्याचे डॉ. आमोद गडीकर यांनी सांगितले.