नवी दिल्ली – अंडरवर्ल्ड डॉन आणि मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी आबू सालेम याने लिस्बनच्या कोर्टात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली आहे. भारतात करण्यात आलेल्या प्रत्यार्पणाच्या कारवाईदरम्यान प्रत्यार्पण कायद्याचा भंग करण्यात आला असल्याचा दावा सालेम याने केला होता. मात्र सालेमने उपस्थित केलेला मुद्दा आपल्या अधिकार कक्षेमध्ये येत नसल्याचे सांगून लिस्बनच्या कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली, असे सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सालेमने उपस्थित केलेल मुद्दा राजकीय आणि मुत्सदेगिरीच्या दृष्टिकोनाशी संबंधित आहे. न्यायालयीन अधिकारकक्षेमध्ये त्याचा समावेश होत नाही, असे सीबीआयने सांगितले. सालेमने आक्षेप घेतलेली बाब प्रशासकीय स्वरूपाची नसून राजकीय आणि मुत्सदेगिरीच्या स्वरूपाची आहे. हा मुद्दा आंतरराष्ट्रीय कायद्याखाली येतो. प्रशासकीय कायद्याखाली येत नाही. त्यामुळे लिस्बन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली, असेही सीबीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले.
सालेमवर सहा आरोप लावण्यात आले होते. पण त्या आरोपांना प्रत्यार्पणात परवानगी दिली गेलेले नव्हती. म्हणून सालेमने भारतातील सर्वोच्च न्यायालयात विशेष सुटीकालीन याचिका दाखल केली होती. त्याच्या प्रत्यार्पणात कोणत्याही नियमांचा भंग झालेला नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने 10 सप्टेंबर 2010 रोजी स्पष्ट केले आहे. याच निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने 2013 साली शिक्कामोर्तबही केले आहे. त्यानंतर सालेमने पोर्तुगालमधील कोर्टात या प्रकरणी याचिका दाखल केली होती. आपले प्रत्यार्पण केवळ मुंबई बॉम्बस्फोट खटल्यासाठीच झाले होते. तरीही भारतात आपल्यावर अन्य आरोपांखालीही खटले चालवले गेले. त्यामुळे प्रत्यार्पणाच्या नियमांचा भंग झाल्याचे त्याने या याचिकेत म्हटले होते.