वाई : बावधन ग्रामपंचायतीमध्ये राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले असून सत्ताधारी गटाच्या विद्यमान सरपंच शुभांगी कांबळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केल्याचे नाटक फक्त एकच दिवस टिकले असून भाजप प्रवेशाची नौटंकी फक्त एक दिवसाची ठरली. आमदार मकरंद पाटील, शशिकांत पिसाळ, दिलीप बाबा पिसाळ, मदन भोसले यांच्या नेतृत्वाखाली सौ.कांबळे या स्वगृही परत आल्याने भाजपवर नामुष्की ओढावली आहे.
सौ.कांबळे स्वगृही परत आल्याने राष्ट्रवादीने पत्रकार परिषद घेवून त्या परत राष्ट्रवादीत आल्याचे जाहीर केले. यावेळी उपसरपंच उदयसिंह पिसाळ, सदस्य तानाजी कचरे, हणमंत कांबळे, वंदना कांबळे, स्मिता भोसले, जयश्री भोसले, प्रियांका कचरे, अंजली किर्वे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
राष्ट्रवादीच्या अंतर्गत मतभेदामुळे त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे मान्य केले सून आमदार मकरंद पाटील व बावधनमधील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी त्यांची समजूत काढल्याने त्यांनी शुक्रवार (दि. 19) रोजी पुन्हा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे काटावरचं बहुमत असलेल्या राष्ट्रवादी अल्पमतात आली होती. वर्षानुवर्षे राष्ट्रवादीच्या ताब्यात असलेली बावधन ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात गेल्याने ग्रामपंचायत गमावण्याची नामुष्की ओढावली होती. ग्रामपंचायत स्थापनेपासून प्रथमच येथे भाजपचा भगवा फडकला होता. भाजपचा हा आनंद हा एक दिवसासाठी टिकल्याने भाजपच्या गोटात शांतता पसरली आहे.
राष्ट्रवादी सत्ताधारी गट त्यांच्यावर अविश्वास ठराव आणणार असल्याचे खोटी दिशाभूल करून भाजपमध्ये येण्यास भाग पाडल्याचे सरपंच शुभांगी कांबळे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. सौ. कांबळे यांनी केलेल्या भाजप प्रवेशाने आजवर कायम राष्ट्रवादीच्या किंबहुना स्व. मदनराव पिसाळ यांच्या विचाराने चालणारी ग्रामपंचायत अशी बावधनची ख्याती होती, त्याला तडा गेला. स्व. पिसाळ यांच्यानंतर शशिकांत पिसाळ, दिलीपराव पिसाळ, मदन भोसले यांच्या नेतृत्वाखाली या ग्रामपंचायतीने प्रभावी काम केले. अलीकडच्या काळात पहिल्या आणि दुसर्या नेत्यांच्या अंतर्गत शह-काटशाहच्या राजकारणाने गावात विरोधी गट दीपक ननावरे यांच्या नेतृत्वाखाली जोमाने वर येत गेला. सौ. कांबळे यांचा भाजप प्रवेश त्याचाच परिपाक असल्याची चर्चा सुरू आहे.
कांबळे अद्याप भाजपमध्येच
ग्रामपंचायत निवडणुकीच्या वेळेस सरपंच पदाचा फॉर्म भरताना शुभांगी कांबळे यांनी दोन्ही पॅनलकडे फॉर्म भरले होते. नंतर राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलमध्ये प्रवेश केला. कांबळे यांनी भाजपमध्ये स्वतःच्या मर्जीने प्रवेश केला आहे. त्यांच्यावर कोणीही जबरदस्ती केलेली नाही. सौ. कांबळे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून सदस्यपद स्वीकारले होते. त्यांचा भाजप सदस्य पदाचा राजीनामा अद्याप आलेला नाही.
दीपक ननावरे (भाजप तालुका अध्यक्ष)