साने देणार विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा 

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते व विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचा एका वर्षाचा कार्यकाळ संपला असल्याने त्यांचा राजीनामा घेण्यात यावा, अशी सूचना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली आहे. शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांना फोन करुन साने यांना राजीनामा देण्यास सांगण्याचे पवार यांनी सांगितले आहे.
राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना विरोधी पक्षनेतेपदाची संधी मिळावी यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने दरवर्षी विरोधी पक्षनेता बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पहिल्यावर्षी विरोधी पक्षनेतेपद भूषविलेले योगेश बहल यांचा वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर राजीनामा घेतला होता.

बहल यांच्या जागी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे चिखलीतील ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने यांची 17 मे 2018 रोजी विरोधी पक्षनेतेपदी वर्णी लागली होती. पक्षाच्या अलिखित ठरलेल्या नियमानुसार साने यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा एक वर्षाचा कार्यकाळ 17 मे 2019 रोजी संपुष्टात आला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदी नवीन नगरसेवकाला संधी देण्यासाठी साने यांचा राजीनामा घेण्यास सांगितले आहे. शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांना फोन करुन साने यांना राजीनामा देण्याला सांगावे, अशी सूचना केली आहे.

दत्ता साने यांचा एक वर्षांचा कार्यकाल संपला आहे. त्यामुळे नवीन नगरसेवकाला संधी देण्यासाठी साने यांना राजीनामा देण्याच्या सूचना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या आहेत. त्यांचा आज फोन आला होता. तशी साने यांना कल्पना दिली असून ते विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देतील.

संजोग वाघेरे, अध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस, पिंपरी-चिंचवड शहर

Leave A Reply

Your email address will not be published.