मोबाइल सेवा ठप्प, विजेचाही लपंडाव

खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील स्थिती : महिनाभरापासून दळणवळणाचा प्रश्‍न गंभीर

राजगुरूनगर – खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम भागामध्ये मोबाइल सेवा गेली महिनाभरापासून ठप्प आहे, तर विजेचा लपंडाव सुरू असल्याने या भागातील नागरिक हैराण झाले आहेत. खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम आदिवासी भागातील सुमारे 60 पेक्षा अधिक गावांमध्ये विजेचा लपंडाव सुरू आहे. सिंगल फेज वीज दिवसांतून शंभरवेळा जात येत असल्याने नागरिक वैतागले आहेत. तर थ्रीफेज वीज आठवड्यातून एक दोन दिबस तेही काही तासच असल्याने नागरिकांच्या दळणवळणाचा प्रश्‍न गंभीर बनला आहे.

खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम भागामध्ये विजेची व मोबाइलची सेवा पूर्ववत करण्याची नागरिकांनी मागणी केली असून या मागणीचे निवेदन खेड तहसीलदारांना बुधवारी (दि. 19) देण्यात आले आहे. हे निवेदन नायब तहसीलदार राजेश कानसकर यांनी स्वीकारले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण चांभारे, खेड पंचायत समितीचे माजी सभापती सुरेश शिंदे, पश्‍चिम विभाग सरपंच संघटनेचे संघटक पांडुरंग जठार, किरण वाळुंज, अनिल सोळशे, संदीप शेलार, किरण मोरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

वाडा मंडल विभागात विजेचा पावसाआधीच लपंडाव सुरू असल्याने आदिवासी भागातील नागरिक वैतागला आहे. या भागात पाऊस नसताना विजेचा लपंडाव सुरू आहे.नागरिकांच्या तक्रारी वीज वितरण कंपनीचे अधिकारी ऐकून घेत नाहीत भरमसाठ अंदाजे वीज बिल पाठवून या भागातील नागरिकांचे मानसिक व शाररिक आणि अर्थीक शोषण करीत आहे. वीज बिल कमी करण्यासाठी आलेल्या नागरिकांना चांगली वागणूक मिळत नाही तर ते कमी करण्यासाठी वाडा व राजगुरूनगरला यावे लागते असल्याने वेळ व पैसे खर्च होत आहेत.

खेडच्या पश्‍चिम भागात केवळ बीएसएनएल(भारत संचार निगम)ची सेवा सुरू आहे. मात्र, याकडे संबंधित विभागाच्या अधिकारी वर्गाचे दुर्लक्ष झाले आहे. मोबाइल सेवा गेली महिनाभरापासून विस्कळीत असून याकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. बॅंकांचे ऑनलाईन व्यवहार ठप्प झाल्याने तासन्‌तास नागरिकांना बॅंकेच्या दारात बसावे लागते आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या भागात मोबाइल रेंजची सुविधा मिळण्याची मागणी नागरिक करीत आहेत मात्र, नेतेमंडळी केवळ निवडणुकीत आश्‍वासने देतात प्रत्यक्षात ती पूर्ण करीत नसल्याने राजकारण्यांसह प्रशासनाच्या कारभाराबाबात नागरिकांमध्ये रोष निर्माण झाला आहे.

बॅंकांचे ऑनलाइन व्यवहार ठप्प
आव्हाट, खरोशी, डेहणे, एकलहरे, गोरेगाव, माझगाव, कळमोडी, धामणगाव, नायफड, शेंदूर्ली, वांजळे, धुवोली, मोरोशी शिरगाव, मंदोशी, टोकावडे, भोरगिरी, कारकुडी, पाभे, भोमाळे, भिवेगाव, भोरगिरी, कुडे, खरपूड, आंबोली, विऱ्हाम, भलवडी, वांद्रा, कोहिंडे, वाजवणे, आदर, देवोशी, सुपे आदी 60हून अधिक गावांमध्ये मोबाइलला रेंज नसल्याने व्यवहार ठप्प झाले आहेत. डेहणे, कुडे, आंबोली गावातील विविध बॅंकांचे ऑनलाईन व्यवहार ठप्प झाले आहेत. शाळा, कॉलेजसह इतर महसुली कामांसाठी लागणारी ऑनलाइन कागदपत्रे मिळत नसल्याने गैरसोय होतेय.

गेल्या अनेक दिवसांपासून पश्‍चिम भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. मोबाइलला रेंज नाही. यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. वर्षानुवर्षे याभागातील नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे. बॅंकांची कामे ठप्प झाली आहेत. या भागात वीजपुरवठा व मोबाईलला रेंज तात्काळ सुरू करावी, अन्यथा आंदोलन केले जाईल.

– अरुण चांभारे, माजी जिल्हा परिषद सदस्य

Leave A Reply

Your email address will not be published.