चंद्रकांत पाटीलच माण – खटावचे खरे भागीरथ

तसली मस्ती करणार नाही
टेंभूचे पाणी माण तालुक्‍याच्या शिवारात आणल्याचा मनस्वी आनंद आहे. या कामामुळे पुढील पाच पिढ्या चंद्रकांत पाटील आणि माझे नाव काढणार आहे, असे देसाई यांनी सांगितले. त्यावर पाणी आल्यानंतर बोटिंग वैगेरे करणार आहे का, असे पत्रकारांनी विचारले असता देसाई म्हणाले, “मी सामान्य कार्यकर्ता आहे. सामान्यच राहणे उचित समजतो. बोटिंग वैगेरे करण्याची तसली मस्ती कदापि करणार नाही.” 

 

गोरेंच्या भाजपात येण्याला विरोध

देशभरात “एक बूथ 25 युथ’ संकल्पना पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी राबविली. मात्र, माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपच्या बूथप्रमुखांना डावलून पोलिंगचे फॉर्म आ. गोरे यांनी घेऊन अमित शहा यांच्या संकल्पनेला तडा देण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यामुळे अशा व्यक्तीला भाजपमध्ये घेण्यास आमचा विरोध आहे. त्याबाबतचे लेखी पत्र पक्षाध्यक्षांना पाठविण्यात आले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत मला अथवा येळगावकर यांना उमेदवारी दिली तर आम्ही एकमेकांचे प्रामाणिकपणे काम करू. मात्र, आ. गोरे यांना कदापि भाजपमध्ये घेण्यात येवू नये. प्रसंगी रिपाइंला जागा सोडली तर रामदास आठवले यांचा एक आमदारदेखील निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू, असे देसाई यांनी सांगितले.

सातारा  – टेंभू योजनेतून माण- खटावला पाणी देण्याची राजकीय इच्छाशक्ती दाखविणारे चंद्रकांत पाटीलच खरे भगीरथ आहेत, असा दावा भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी केला. कालपर्यंत टेंभू योजनेचे नाव ही न काढणारे आमदार जयकुमार गोरे आता शिवारात पाणी आल्याचे पाहून श्रेय घेऊ पाहत आहेत. मात्र, दुष्काळी जनता आता त्यांच्या भूलथापांना थारा देणार नाही, असा टोला देसाई यांनी लगावला.

साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संदीप भोसले, पिंटू जगदाळे, दादासाहेब शिंदे आदी उपस्थित होते. देसाई म्हणाले, “”माण-खटाव तालुक्‍यातील जनतेला टेंभू योजनेतून पाणी मिळावे, यासाठी 2003 पासून लढा देत आहे. त्याचबरोबर माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनीही सातत्याने आवाज उठविला. मात्र, आमच्या लढ्याला खऱ्या अर्थाने भाजप सरकार आल्यापासून यश मिळायला सुरुवात झाली. टेंभू योजनेतून माण- खटावसाठी पाणी देण्याची मागणी सातत्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे केली होती. त्यावेळी अधिकाऱ्यांचे कारण सांगून पाणी देण्यास टाळाटाळ करण्यात आली.

मात्र, टेंभूतून पाणी देण्याचा प्रस्ताव चंद्रकांत पाटील यांच्यासमोर सादर करण्यात आला. तेव्हाही अधिकाऱ्यांनी टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. त्यावर पाटील यांनी कडक शब्दात कोणत्याही परिस्थिती टेंभूतून पाणी मिळालेच पाहिजे, त्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. पाटील यांच्या प्रयत्नामुळे माण तालुक्‍यातील 16 गावांना पिण्यासाठी मदत व पुनर्वसन खात्यातून निधीची तरतूद करण्यात आली. योजनेचे काम जलसंपदा खात्याने पूर्ण केले. त्यामुळे महाबळेश्‍वरवाडी तलावात 21 बंधाऱ्यांच्या माध्यमातून पाणी देण्याचा प्रयोग यशस्वी झाला आहे. अशाच प्रकारे लवकरच खटाव तालुक्‍यातील गावांना पाणी मिळणार आहे.”

अशा स्थितीत माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे टेंभूच्या पाण्याच्या योजनेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आमदारकीच्या दहा वर्षाच्या कार्यकालात त्यांनी टेंभूचा साधा उल्लेखदेखील केला नाही. आम्ही ज्या ज्या वेळी आवाज उठवित होतो. त्यावेळी त्यांनी आमची खिल्ली उडविली. मात्र, आता टेंभूच्या पाण्याच्या मागणीसाठी बैठका लावण्याचे पत्र मंत्र्यांना देत आहेत. वास्तविक तत्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकालात गोरे गळ्यातील ताईत असल्याप्रमाणे वावरत होते. त्याचवेळी टेंभू योजनेतून पाणी आणण्याचे प्रयत्न करायला हवे होते. मात्र, आज ते नौटंकी करत आहेत. परंतु जनता आता त्यांच्या असल्या भुलथापांना कदापि थारा देणार नाहीत, असा टोला देसाई यांनी लगावला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.