Russia Ukraine War : रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याला एक वर्ष 9 महिने उलटून गेले, पण अजूनही या युद्धावर कोणताही तोडगा निघालेला नाही. हजारो रशियन सैनिक अजूनही युक्रेनमध्ये लढत आहेत. दुसरीकडे, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यावर लषकरी कुटुंबीयांचा राग व्यक्त होताना दिसत आहे. त्यासाठी रशियन सैनिकांच्या कुटुंबीयांनी मोठ्या संख्येने राजधानी मॉस्कोमध्ये निदर्शने केली असून त्यांनी आपला मुलगा, पती परतबोलावण्याची सरकारकडे मागणी केली आहे.
सोशल मीडियावर आंदोलनाचे अनेक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत. यामध्ये रशियात युद्ध लढणाऱ्या सैनिकांच्या माता, बहिणी, मुली आणि पत्नींनी भाग घेऊन घोषणाबाजी केली. आता पुतिन यांनी दिलेले वचन पाळावे, अशी महिलांची मागणी आहे. वर्षभरापूर्वी घर सोडलेल्या सैनिकांच्या पत्नी म्हणतात की,” त्यांना युद्ध नको, शांतता हवी आहे. सैनिकांना लवकरात लवकर त्यांच्या मायदेशी परत बोलवावे”
युद्धाच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या महिलांनी व्हिडिओ संदेशात म्हटले आहे की, “आम्हाला शांतता हवी आहे. एक वर्षापूर्वी युक्रेनमध्ये लढण्यासाठी गेलेल्या सैनिकांना आता मायदेशी आणले पाहिजे. ते असे का करत नाहीत? आमचे सैन्य जगात लढत असतानाही आज ते सर्वोत्कृष्ट सैन्य बनले असेल, परंतु याचा अर्थ असा नाही की ही सेना शेवटच्या सैनिकापर्यंत तिथेच राहावी.”
आणखी एक आंदोलक महिला म्हणाल्या, “आमच्या मुलांनी देशासाठी शौर्याने लढा दिला आहे. त्यांनी आपले रक्त सांडले आहे. आता त्यांनी आपल्या कुटुंबाकडे परतावे, पण सरकार असे का करत आहे?” युक्रेनमधील काम पूर्ण झाल्यानंतर सैन्य परत आणले जाईल, असे आश्वासन रशियन सरकारने दिले होते, असे या महिलांचे म्हणणे आहे.
तर सरकारचे म्हणणे आहे की “सध्या युक्रेनमध्ये रशियन सैन्याचे काम पूर्ण झालेले नाही. त्यांची तिथे गरज असते. युद्ध अजून संपलेले नाही. युद्ध संपताच सैनिक परत येतील. सध्या ते मातृभूमीसाठी कार्यरत आहेत.”