वॉशिंग्टन – अमेरिकेत दोन वाहनांची समोरासमोर धडक झाल्यामुळे २ भारतीय विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अरिझोना प्रांतात लेक प्लेसंट येथे हा अपघात झाला, असे पोलिसांनी सांगितले.
या अपघातात मरण पावलेले दोन्ही विद्यार्थी मूळचे तेलंगणचे रहिवासी होते आणि निवेश मुक्का आणि गौतम पारसी अशी त्यांची नावे आहेत. दोघेही १९ वर्षांचे होते आणि अरिजोना स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत होते.
दिनांक २० एप्रिलला संध्याकाळी सव्वा ६ वाजण्याच्या सुमारास कॅसल हॉट स्प्रिंग रोडवर हा अपघात झाला. दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली. त्यानंतर एकाचवेळी अनेक वाहने एकमेकांवर धडकली होती.
त्यामध्ये या दोघांचा जागेवरच मृत्यू झाला. दोन्ही कारचे चालक जखमी झाले असून रुग्णालयात उपचारांनंतर त्यांना सोडून देण्यात आले आहे, असे पोलिसांनी सांगितले.
या अपघातामागील नेमके कारण तपासले जात आहे. दोन्ही भारतीय विद्यार्थ्यांच्या भारतातील कुटुंबीयांशी संपर्क साधला गेला असून मृतदेह भारतात पाठवण्याची प्रक्रीया सुरू केली आहे.