राजगुरूनगर -येथील राजगुरुनगर एसटी आगाराच्या वतीने खेड व आंबेगाव तालुक्यातील निवडक मार्गांवर प्रवाशांसाठी एसटी बससेवा सोमवार (दि. 15) पासून सुरु केली जाणार आहे, अशी माहिती राजगुरुनगर एसटी आगाराचे आगारव्यवस्थापक रमेश हांडे व वाहतूक निरीक्षक तुकाराम पवळे यांनी केले आहे.
करोना आजाराच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या गंभीर परिस्थितीमुळे संचारबंदी लागु आहे. कन्टेमेंट व रेडझोन वगळता इतर भागात सुरक्षिततेची काळजी घेऊन प्रवासी वाहतूक करण्यास शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार केवळ तालुकाअंतर्गत प्रवासी वाहतूक सुरु होणार असल्याचे आगारव्यवस्थापक हांडे यांनी सांगितले. ही सेवा प्रायोगीक तत्वावर राबविली जाणार असून प्रवाशांच्या प्रतिसादानुसार फेऱ्यांमध्ये वाढ केली जाणार आहे.
तसेच प्रत्येक बसमध्ये आसनक्षमतेच्या 50 टक्केच प्रवासी घेतले जाणार असून प्रत्येक फेरीनंतर व आधी बसचे निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. याशिवाय प्रवासादरम्यान प्रवासी व कर्मचाऱ्यांनी सॅनिटायझर आणि तोंडाला मास्क लावणे बंधनकारक आहे. सोमवारपासून तालुक्यांतर्गत एसटी बससेवा सुरू करण्यात येणार आहे. नागरिकानी करोनाचे नियम पाळून प्रवास करावा. आगाराच्या वतीने माल वाहतूक सेवा सुरू केली असून सवलतीच्या दरात ती उपलब्ध केली आहे. व्यापारी, नागरिकानी या सेवेचा फायदा घ्यावा, असे आवाहन रमेश हांडे यांनी केले आहे.