नारायणगाव -लॉकडाऊनमुळे तीन महिने बंद असलेल्या एसटी बससेवा सोमवार (दि. 15) पासून जुन्नर तालुकातंर्गत सुरू होणार आहेत. त्यासाठी नियम पाळून एका बसमध्ये एकाचवेळी मास्क घालून 22 प्रवासीच प्रवास करू शकणार आहेत, अशी माहिती नारायणगाव आगारच्या प्रमुख शिवकन्या थोरात यांनी दिली.
जुन्नर तालुक्यात पहिल्या टप्प्यात नारायणगाव- मंचर-आळेफाटा, नारायणगाव-ओझर -ओतूर, नारायणगाव-उंब्रज-ओतूर, ओतूर-जुन्नर मार्गांवर बस फेऱ्या सुरू केल्या जाणार आहेत. पुढे प्रवासी संख्या बघून त्यात वाढ करण्यात येणार आहे. नारायणगाव जुन्नर रोडवर आर्वीजवळ कॅनॉलची भिंत पडल्याने हा रस्ता वाहतुकीस बंद असल्याने हा रस्ता सुरू झाल्यानंतर जुन्नर मार्गावर वाहतूक सुरू करण्यात येईल. या प्रवासात लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना प्रवास करण्यास परवानगी नसल्याने प्रवास करता येणार नाही.