पालकमंत्री शिंदे यांचा तब्बल 43 हजार 347 मतांनी पराभव
जामखेड – संपूर्ण राज्याचे लक्ष वेधलेल्या कर्जत- जामखेड विधानसभा मतदारसंघात पालकमंत्री राम शिंदे यांचा धक्कादायक पराभव झाला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातु रोहित पवार यांनी तब्बल 1 लाख 35 हजार 824 मते घेऊन शिंदे यांचा 43 हजार 347 मतांनी पराभव केला.ही निवडणूक राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपने अत्यंत प्रतिष्ठेची केली होती.
गेल्या 25 वर्षाच्या भाजपच्या बालेकिल्लेला राष्ट्रवादीने सुरुंग लावला आहे. रोहित यांच्या रुपाने पवार घराण्यातील तिसरी पिढी पहिल्यांदाच विधानसभेत जाणार आहे. विजयाकडे घौडदौड करीत असतानाच कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष साजरा करीत लाडु वाटून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा केला. आज कर्जत येथील तहसील कार्यालयाच्या आवारात असलेल्या शासकीय गोडावूनमध्ये मतमोजणी करण्यात आली. यावेळी यावेळी 353 मतदान केंद्र, 14 टेबल व 26 फेऱ्याव्दारे मतमोजणी झाली.
पहिल्या फेरीपासून रोहित पवार यांनी शेवटपर्यंत आघाडी घेतली. दरम्यान, सकाळी पालकमंत्री राम शिंदे यांनी मतमोजणी केंद्रात प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांनी मतमोजणी केंद्रात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. जस जशी मतमोजणी सुरू झाली, तस तसे रोहित पवार यांचे मताधिक्या वाढतच गेले. पंधरावी फेरी सुरू झाली तरी रोहित पवार मतांची आघाडी घेतच होते. अखेर रोहित पवार यांचे मताधिक्य वाढत असल्याचे पाहुन राम शिंदे यांनी मागच्या गेटने बाहेर पडत मतमोजणी ठिकाणाहुन काढता पाय घेतला. गाडीच बसुन निघुन गेले. दरम्यान रोहित पवार यांनी तहसील कार्यालयाच्या मिडिया सेल मध्ये तब्बल एक ते दीड तास बसून राज्याचा निवडणूकीचा आढावा घेतला.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातु रोहित पवार व पालकमंत्री राम शिंदे यांच्या लढतीमुळे कर्जत जामखेड मतदार संघाने राज्याचे लक्ष वेधले होते. शिंदे यांनी विकासासाठी काम करीत मंत्रीपदाच्या काळात कोट्यवधी निधी आणला. मात्र जवळच्या कार्यकर्त्यांच्या मनमानी कारभारामुळे जनतेच्या मनात राम शिंदे यांच्याबाबत द्वेष निर्माण झाला होता. राम शिंदे यांनी जनतेच्या भावनांची कदर केली नाही. जवळच्या कार्यकर्त्यांना महत्त्व दिले. अशी जनतेची कायम ओरड राहीली, तरी देखील राम शिंदे यांनी दुर्लक्ष केले. यामुळे जनतेच्या मनातला रोष ओळखून राष्ट्रवादीचे यूवा नेते रोहित पवार यांनी जामखेड कर्जत मध्ये प्रवेश केला.
जनतेची पाण्याची गरज पूर्ण करत विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविले व जनतेच्या मनात कमी कालावधीत जागा मिळवली. राम शिंदे यांनी जंगजंग पछाडले मात्र रोहित पवार यांच्या भावनिक आवाहनाला व केलेल्या सामाजिक कामाला जनतेने प्रतिसाद दिला. यावेळी कर्जत शहरातुन क्रेनव्दारे रोहित पवार यांना फुलांचा हार घालण्यात आला. दरम्यान कालपासुनच मतदारसंघात रोहित पवार अभिनंदनाचे फलक लावण्यात आले होते. मतदारसंघात रोहित पवार निवडुन आले असल्याची चर्चा सुरू झाली होती. शिंदे यांना जवळच्याच कार्यकर्त्यांकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला असल्याची चर्चा कर्जत शहरात होती.