विकासाची घोडदौड कायम : आ. थोरात
संगमनेर तालुक्यातील जनतेचा हा विजय आहे. आपल्यावर जनतेने कायम विश्वास ठेवला असून आपणही अविश्रांतपणे सातत्याने काम केले असून आणखी कामे करण्यासाठी ताकद मिळणार आहे. तालुक्याच्या विकासाची घोडदौड कायम ठेवणार आहे.पुन्हा एकदा कॉंग्रेस उभी राहील असा विश्वास असे, कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
संगमनेर – कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना संगमनेरमध्ये अपेक्षेप्रमाणे निवडून येण्यात काहीच अडचण आली नाही. त्यांच्या विरोधातील उद्योजक साहेबराव नवले यांचे आव्हान अगदीच किरकोळ ठरले. थोरात यांनी 1 लाख 25 हजार 380 मते घेत विक्रमी 62 हजार 252 मतांनी मताधिक्याने विजय मिळवला, यावरून त्यांचे वर्चस्व आठव्यांदा सिद्ध झाले.
थोरात यांच्या विरोधात उद्योजक साहेबराव नवले यांना शिवसेनेने उमेदवारी दिली होती. नवले यांनी थोरात यांच्या विरोधात जोरदार प्रचार केला. त्यांच्यासाठी विखे पितापुत्रांनी गावोगाव सभा, मेळावे घेत थोरातांना आव्हान देण्याचा प्रयत्न केला. थोरात यांच्यावर राज्याची जबाबदारी असल्यामुळे ते मतदारसंघात कमी अन् इतर उमेदवारांच्या प्रचारातच जास्त राहिले. थोरात यांनी राज्यभरात 60 पेक्षा अधिक सभा घेतल्या. त्यामुळे नवले हे कडवी झुंज देतील, असे बोलले जात होते. मात्र, पहिल्या फेरीपासूनच थोरातांनी घेतलेली आघाडी कायम टिकवली. थोरात यांनी 1 लाख 25 हजार 380 मते घेतली तर नवले यांना 63 हजार 188 मते मिळाली. अखेरीस थोरातांनी 62 हजार 192 मतांनी मताधिक्याने विजय मिळवले.
विजयानंतर संगमनेर शहरांमध्ये जल्लोष रॅली संपन्न झाली. यामध्ये युवक, महिला, नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत सर्वत्र गुलालाची उधळण केली. एकच साहेब, थोरात साहेब, कोण आला रे कोण आला, महाराष्ट्राचा वाघ आला या घोषणांनी संगमनेर दुमदुमून गेले. सर्वत्र आमदार बाळासाहेब थोरात यांच्यावर पुष्पवृष्टी व गुलालाची उधळण झाली. फटाक्यांची आतिषबाजी करत सर्व तरुणांनी आनंदोत्सव साजरा केला. गावोगावी ही भव्य जल्लोष मिरवणूका निघून थोरात यांचे अभिनंदन करण्यात आले. दरम्यान संगमनेरमध्ये एक दिवस अगोदर बुधवारीच बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांनी विजयाचे फलक लावले होते. “पर्मनंट आमदार’ अशी उपाधी देत पेढे भरवत या फलकवर शुभेच्छा देण्यात आल्या होत्या.