बारामतीतून सलग सातव्यांदा झाले विजयी
बारामती – बारामती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अजित पवार यांनी रेकॉर्डब्रेक विजय संपादन केला. 1,95,641 मतांचे विक्रमी मताधिक्य मिळवित अजित पवार विजयी झाले आहेत. अजित पवार यांच्या विजयामुळे भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा दारुण पराभव झाला. पडळकर यांना 30,376 मते मिळाली. अजित पवार यांच्या विजयाने भारावलेल्या बारामतीकरांनी एकच जल्लोष करीत विजयोत्सव साजरा केला. बारामती मतदारसंघात अजित पवार सलग सातव्यांदा आमदार म्हणून निवडून आले आहेत.
बारामती येथील वखार मंडळाच्या गोदामात सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासूनच अजित पवार यांनी आघाडी कायम राखली. मतमोजणीच्या 27 फेऱ्या झाल्या, यामध्ये प्रत्येक फेरीत पवार यांची आघाडी वाढत गेली. अजित पवार हे सातव्यांदा बारामतीचे आमदार म्हणून विधानसभेत नेतृत्व करणार आहेत. यंदा त्यांच्यासमवेत बारामतीचेच कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून रोहित पवार हे ही असतील. काका-पुतण्यांची जोडी विधानसभेत दिसणार आहे.
बारामती मतदारसंघात विरोधी सर्व उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाल्यामुळे प्रथमत: इतिहास घडला आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी बारामतीसाठी ताकद लावल्याने बारामतीकरांची अस्मिता जागी झाली आणि बारामतीकरांनी देखील अजित पवार यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले त्यामुळे विरोधक बारामतीकरांपुढे हतबल ठरले. स्थानिक उमेदवारांना डावलत मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली.
पडळकर यांच्या पाठीशी मुख्यमंत्र्यांचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी ताकत लावली असले तरी स्थानिक उमेदवारी न मिळाल्याने स्थानिक नेते मात्र नाराज राहिले. निवडणुकीत स्थानिक नेते नसल्याने त्याचा परिणाम देखील भाजपच्या उमेदवारावर झाला. 2014च्या विधानसभा निवडणुकीपेक्षा 50 टक्के मतांची घट यंदाची निवडणूक किती झाली. दुसरीकडे आयात उमेदवाराला नाकारत अजित पवार यांना लाखापेक्षा अधिक मताधिक्य मिळवून देण्याचा चंग बारामतीकरांनी बांधला होता, अन् तो प्रत्यक्षात ही आणला.
‘आयात’ उमेदवार असल्याने…
बारामतीच्या जागेवर विजय सांगणे म्हणजे हवेतील दावा होईल, असे वक्तव्य करीत भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी बारामती येथील जाहीर सभेत सांगितले होते, त्यामुळे स्थानिक नेत्यांचे मनोधर्य खचले. 2014च्या निवडणुकीत स्थानिक नेते रिंगणात असल्याने भाजपाला चांगली मते मिळवून आव्हान निर्माण केले होते. यंदा उमेदवार आयात केल्याने 30 हजार मते मिळाली, त्यामुळे डिपॉझिट गमवावे लागले स्थानिक उमेदवार असता तर डिपॉझिट वाचले असते, अशीही चर्चा रंगली आहे.
भाजपच्या पडळकरांचे डिपॉझिटही जप्त – अजित पवार यांना घेरण्यासाठी भाजपच्या वतीने गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी देण्यात आली. 2019च्या लोकसभा निवडणुकीचा पॅटर्न 2019च्या बारामती विधानसभेसाठी भाजपाने वापरला. मात्र, यामध्ये भाजपचा दारुण पराभव झाला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी 1 लाख 65 हजार 265 एवढ्या मताधिक्याने विजयी संपादन केला. त्यामुळे मुख्यमंत्री ज्यांना ढाण्या वाघ म्हणून समजत होते ते महायुतीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांचे बारामती विधानसभा मतदारसंघात डिपॉझिट जप्त झाले.