लंडन– ब्रिटनचे चीनबरोबरचे सोन्याचे युग आता समाप्त झाले आहे, असे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी जाहीर केले आहे. चीनच्या राजवटीचे धोरण ब्रिटीश मूल्ये आणि ब्रिटनच्या हिताला नियोजनपूर्वक बाधा आणत असल्याचे आता उघड झाल्यामुळे चीनबरोबरचे आतापर्यंतचे संबंध संपुष्टात आणण्यात येणार असल्याचे सुनक यांनी जाहीर केले आहे.
सोमवारी रात्री लॉर्ड ऑफ मेयर बॅंक्वेटमधील भाषणामध्ये ऋषी सुनक यांनी देशाच्या परराष्ट्र धोरणाबाबत प्रथमच उघडपणे भाष्य केले आहे. चीनच्या मानवी हक्क विषयक आतापर्यंतच्या पार्श्वभुमीवर टीका करताना आपल्याला चीनबाबत ब्रिटनच्या संबंधांमध्ये सुधारणा करायच्या आहेत, असेही सुनक यांनी सांगितले.
मात्र त्याबरोबर जागतिक व्यवहारांमधील चीनच्या वाढत्या प्रभावाकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. त्यामुळे आपला दृष्टिकोन व्यवहारिकतेला मजबूत करण्याचा आणि दीर्घकालीन संबंधांच्या दृष्टीने असणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र सामाजिक आणि राजकीय सुधारणांसंदर्भात चीनबरोबरचे सोन्याचे युग आता समाप्त झाले आहे, हे मात्र नक्की असे त्यांनी जोर देऊन सांगितले.
Japan : जपानमधील जन्मदराचे घटले प्रमाण; Birth Rate वाढवण्यासाठी सरकारकडून खास…
चीनमधील कोविड निर्बंधांविरोधातील आंदोलन हाताळणे आणि बीबीसीच्या पत्रकाराला मारहणीवरही सुनक यांनी नाराजी व्यक्त केली. वातावरण बदल आणि जगाच्या राजकारणातील चीनच्या भुमिकेकडेही दुर्लक्ष करता येण्यासारखे नाही, असेही ते म्हणाले.