लंडन – इस्रायल-गाझा युद्धाच्या मुद्यावर ब्रिटनच्या संसदेच्या कनिष्ठ सभागृहात मतदान करण्यावरून खासदारांना धमकावले जात असल्याची पंतप्रधान ऋषी सुनक यांनी दखल घेतली आहे. राजकारणातील या विषारी संस्कृतीबाबत त्यांनी इशाराही दिला आहे.
दहशतवादाचे समर्थन करण्यासाठी कट्टरवाद्यांकडून रस्त्यांवर केल्या जाणार्या आंदोलनाचा त्यांनी निषेध केला आहे. गाझा-इस्रायल युद्धाबाबत मतदान करण्याविषयी संसदेतील ३ खासदार महिलांना धमक्या मिळाल्या असून त्यांना अतिरिक्त सुरक्षा पुरवण्यात आली आहे, असे वृत्त नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. त्या अनुषंगाने सुनक यांनी हा इशारा दिला आहे.
हमासने ७ ऑक्टोबरला इस्रायलवर हल्ला केल्यापासून कट्टरवाद आणि पूर्वग्रहदूषित विचारांचा स्फोटच झाला आहे. ही विचारप्रणाली ब्रिटनमध्ये अगदी अमान्य आहे. हा विचार म्हणजे निव्वळ वंशवाद आहे, असे सुनक म्हणाले.
संसद सदस्यांना धमकावले जाण्याचा प्रकार अतिशय गंभीर आणि निंदनीय आहे. हा प्रकार आपल्या समाजासाठी विषारी आणि राजकारणासाठी घातक आहे. ब्रिटनमधील मूल्ये आणि स्वातंत्र्यासाठीही योग्य नाही, असेही सुनक म्हणाले.
हाऊस ऑफ कॉमन्समध्ये गाझा-इस्रायलच्या मुद्यावर झालेल्या खडाजंगीच्या वेळी सुनक यांनी याविषयावरील आपले थेट मत व्यक्त केले.
मात्र हाऊस ऑफ कॉमन्समधील ज्या ३ महिला खासदारांना धमकी दिली गेली, त्यांची नावे सुनक यांनी उघड केली नाहीत.
आपल्याच पक्षाच्या खासदाराचे केले निलंबन
संसदेत जोरदार चर्चा होण्यापूर्वी सुनक यांच्याच कन्झर्वेटिव्ह पार्टीचे खासदार ली ऍन्डरसन यांनी लंडनचे पाकिस्तानी वंशाचे महापौर सादिक खान यांच्यावर आक्षेपार्ह टीका केली होती. खान हे इस्लामी मनोवृत्तीचे असल्याचे ऍन्डरसन म्हणाले होते. या वक्तव्यावरून पक्षाने ऍन्डरसन यांना तात्काळ निलंबित केले आहे.