सातारा – सातारा जिल्ह्याच्या बहुतांश भागात शनिवारी दुपारनंतर परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे बटाटा, सोयाबीन, टोमॅटो उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. करोनाच्या संकटात आधीच अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीत त्यामुळे आणखी भर पडली आहे. सरकारने नुकसानीचे पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.
सातारा जिल्ह्यात यावर्षी पावसाने सर्वच हंगामात हजेरी लावली आहे. ढगाळ वातावरण, सतत कोसळणारा पाऊस यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. करोनाच्या संकटात शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. लॉकडाऊनमुळे तर शेतकऱ्यांपुढील संकट आणखीनच वाढलेले असताना अवेळी कोसळणाऱ्या पावसाची त्यात आणखीनच भर पडली. हवामान विभागाने सुद्धा सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला होता.
पावसाचा अंदाज आल्याने शेतकऱ्यांची बटाटा, सोयाबीन काढणीची लगबग सुरु झाली आहे. सोयाबीनची काढणी अंतिम टप्प्यात असली तरी कोरेगाव, खटाव, महाबळेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आलेल्या बटाटा पिकाची काढणी आता सुरु होत आहे. अशा परिस्थितीत शेतात पावसाचे पाणी साठून राहिल्याने बटाटा पिकाचे मोठे नुकसान होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
कराड, पाटण, कोरेगाव, सातारा, वाई, जावळी, महाबळेश्वर आदी तालुक्यात परतीच्या पावसाचा शेतकऱ्यांना फटका बसला आहे. विशेषत: बटाटा, सोयाबीन, टोमॅटो उत्पादकांच्या अडचणीत भर घालणारा हा पाऊस होता. द्राक्ष, डाळिंब उत्पादकांचीही या पावसामुळे डोकेदुखी वाढली आहे. शेतात पाणी साठून राहिल्याने पिकांचे नुकसान झाले असून प्रशासनाने पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.
उत्तर कोरेगावमधील करंजखोप, रणदुल्लाबाद, सोनके आदी भागात बटाटा लागवड मोठ्या प्रमाणात असून परतीच्या पावसामुळे या पिकाचे नुकसान होण्याचा धोका आहे. शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा, अशी मागणी कोरेगाव मार्केट कमिटीचे संचालक आणि प्रगतशील शेतकरी गुलाबराव जगताप यांनी केली आहे.
पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साठून राहिल्याने बटाटा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. करोनाच्या संकटात आधीच अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांवर परतीचा पाऊस आघात ठरणार आहे. जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे करणार आहे.
मंगेश धुमाळ, कृषी सभापती जि. प. सातारा