बॅकलॉग विद्यार्थ्यांसाठी सुधारित वेळापत्रक
पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षांना सोमवारपासून (दि.12) सुरुवात होणार आहे. यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. दरम्यान, बॅकलॉग विद्यार्थ्यांनी ई-मेल आयडी न नोंदविल्यामुळे व त्यांनी मॉक टेस्ट न दिल्याने त्यांच्या परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार ही परीक्षा मंगळवारपासून सुरू होणार आहे.
अंतिम सत्र परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन किंवा ऑफलाइन असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. बहुपर्यायी प्रश्न पद्धतीने ही परीक्षा होणार आहे. त्यानुसार ऑनलाइन नोंदणीसाठी मुदतही दिली. त्यानंतर विद्यापीठाने पदवी व पदव्युत्तर परीक्षांचे वेळापत्रकही जाहीर केले.
परीक्षेसाठी पुणे, अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यांतील एकूण 2 लाख 50 हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यातील 2 लाख विद्यार्थी ऑनलाइनद्वारे परीक्षा देणार आहेत. सुमारे 3 हजार 300 विषयांची परीक्षा होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा 12 ऑक्टोबरपासून सुरू होणार होत्या. मात्र, त्यात बदल केला आहे. केवळ बॅकलॉग परीक्षा 12 ऐवजी 13 ऑक्टोबरपासून नियोजित वेळापत्रकानुसार होणार आहे. नियमित विद्यार्थ्यांच्या परीक्षेच्या वेळापत्रकात कोणताही बदल झालेला नाही, असे विद्यापीठ परीक्षा मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांनी सांगितले.
विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी सरावासाठी “मॉक टेस्ट’ची सुविधा उपलब्ध करून दिली होती. मात्र, ती केवळ दीड लाख विद्यार्थ्यांनीच दिली. सुमारे 40 ते 50 हजार विद्यार्थ्यांनी “मॉक टेस्ट’चा सराव केलाच नाही. यात प्रामुख्याने बॅकलॉगविद्यार्थ्यांचा समावेश आहे. त्यांनी ई-मेल आयडीही नोंदविले नव्हते. त्यांनी मॉक टेस्टसाठी मुदत देण्याची मागणी केली होती.
त्यानुसार त्यांना संधी देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. त्यामुळे 12 ऑक्टोबर रोजी बॅकलॉग विद्यार्थ्यांची विषय निहाय होणारी परीक्षा 17 ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना “मॉक टेस्ट’साठी एक दिवस मिळणार आहे. 13 ऑक्टोबरपासून नियोजित वेळापत्रकानुसार बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे.