श्रीगोंदा -तालुक्यातील टाकळी कडेवळीत येथे छापा घालून श्रीगोंदा पोलिसांनी 37 हजार रुपयांची गांजाची झाडे जप्त केली. या प्रकरणी श्रीगोंदा पोलिसांत एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब जाधव यांना टाकळी कडेवळी येथे गट क्रमांक 7 मध्ये धोंडिबा गणपत सोनवणे यांच्या घरामागे गांजाची झाडे लावल्याची माहिती मिळाली. जाधव यांनी दिलेल्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी सहाय पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांसह पोलीस पथक सोबत घेत घटनास्थळी छापा घाताला. यावेळी तहसीलदार प्रदीप पवार, तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ मस्के यांनाही घटनास्थळी बोलावून घेतले.
यावेळी सोनवणे यांच्या घरापाठीमागे 30 गांजाच्या झाडांची बेकायदेशीर लागवड केल्याचे आढळले. सुमारे 37 हजार 500 रुपये किंमत असलेल्या गांजाच्या झाडांचा पंचनामा करून ही झाडे जप्त करण्यात आली. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.