धरण क्षेत्रांत पावसाची विश्रांती

खडकवासला, पानशेतमधून विसर्ग बंद ः धरणसाठा 96 टक्‍क्‍यांवर

पुणे – शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीच्या पाणलोट क्षेत्रांत शनिवारी पावसाने विश्रांती घेतली. दरम्यान, पाऊस थांबल्याने या खडकवासला तसेच पानशेत धरणातून सुरू असलेला पाण्याचा विसर्ग दुपारी तीन वाजता बंद करण्यात आला. तर, या चारही धरणांचा पाणीसाठा 96 टक्‍के झाला आहे. त्यामुळे शहराची पाण्याची तसेच जिल्ह्यातील सिंचन योजनांची पाण्याची चिंता मिटली आहे.

या धरणसाखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव आणि टेमघर या चारही धरणांचा पाणीसाठा जुलैअखेरपर्यंत 33 टक्‍क्‍यांपर्यंत खाली आला होता. त्यातच, जुलै संपला तरी पाऊस नसल्याने ऑगस्टमध्येही पाऊस लांबल्यास शहरात पाणीकपात करण्याचे संकेत पाटबंधारे विभागाने दिले होते. मात्र, ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्याच्या सुरुवातीलाच या चारही धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाला सुरुवात झाली होती. त्यानंतर अवघ्या आठवड्याभरातच या चारमधील खडकवासला आणि पानशेत ही दोन्ही धरणे 100 टक्‍के भरली असून वरसगाव धरण 97 टक्‍के भरले आहे.

तर, टेमघर धरणही 80 टक्‍के भरले आहे. तर, गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी दिवसभर पुन्हा जोरदार पाऊस झाल्याने पानशेत धरणातून पानशेत धरणातून 6 हजार क्‍युसेक, तर खडकवासला धरणातून 16 हजार क्‍युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. मात्र, शुक्रवारी दिवसभरात या चारही धरणांमध्ये पावसाचा जोर ओसरल्याने खडकवासला तसेच पानशेत धरणातील पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.