40 ते 50 टक्क्यांनी मागणी घटली ः आवक मुबलक असली तरी मागणी कमी
पुणे – गणेशोत्सवावर यंदा करोनाचे सावट असल्याने दरवर्षीच्या तुलनेत भुसार मालास उठाव कमी आहे. गौरी-गणपतीत किराणा आणि भुसार मालाची मागणी आणि खरेदीही वाढते. यंदा मात्र करोनामुळे भुसार बाजारात खरेदीसाठी फारशी गर्दी नसल्याचे चित्र आहे. भुसार मालास सुमारे 40 ते 50 टक्क्यांनी मागणी घटली आहे.
श्रावण, गौरी-गणपती, नवरात्रोत्सव, दिवाळीत भुसार मालाच्या मागणीत मोठी वाढ होते. मात्र यंदा खासगी उद्योग, व्यवसाय, कार्यालये बंद ठेवण्यात आली. त्यामुळे खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या नोकरदारांना आर्थिक चणचणीला सामोरे जावे लागले.
या सर्व बाबींचा परिणाम खरेदीवर दिसून येत आहे. दरवर्षी गणेशोत्सवात खरेदीसाठी होणाऱ्या गर्दीमुळे भुसार बाजारात उत्साहाचे वातावरण असते. यंदा फारशी गर्दी नाही. सध्या मार्केट यार्डातील भुसार बाजारात भुसार मालाची आवक मूबलक होत असली तरी मागणी कमी आहे. दरवर्षी गौरी-गणपतीच्या सणासाठी डाळी, बेसन पीठ, तेल, शेंगदाणे, पोहे, रवा, साखर, पिठीसाखर, गूळ अशा जिन्नसांना मोठी मागणी असते. यंदा अन्नधान्याला मागणी कमी असल्याचे दी पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी सांगितले.
खासगी कार्यालये आणि उद्योग अध्याप पूर्ण क्षमतेने सुरू झाले नाहीत. त्यामुळे अनेक कर्मचारी घरातून काम करत आहेत. उद्योग, खासगी कार्यालयातील कॅन्टीन, शहरातील हॉटेल्स अद्याप सुरू झाली नाहीत. एसटी सेवा, रेल्वे सेवा बंद आहेत. त्यामुळे बाहेरगावाहून खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांच्या संख्येत घट झाली आहे.
– पोपटलाल ओस्तवाल, अध्यक्ष, दी पूना मर्चंट्स चेंबर