मुंबई : जगाला धडकी भरवणाऱ्या करोनाच्या नव्या ओमिक्रॉन या व्हेरियंटने जगाला धडकी भरली आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रासह देशभरात याविषयी सतर्कता बाळगण्यात येत आहे. दरम्यान, गेल्या १५ दिवसांमध्ये आफ्रिकेतील देशांमधून ४६६ प्रवासी मुंबईत दाखल झाले आहेत. यापैकी १०० जण मुंबईतील असून त्यांच्या पुन्हा चाचण्या करण्याचा निर्णय पालिकेने घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुंबईत १२ नोव्हेंबरपासून ४६६ प्रवासी आफ्रिकेतील देशांमधून आले आहेत. यातील १०० प्रवासी मुंबईतील आहेत, तर ३६६ प्रवासी मुंबईबाहेरील आहेत. मुंबईत असलेल्या १०० प्रवाशांपैकी एकालाही करोनाची बाधा झालेली नव्हती. त्यांचा विलगीकरणाचा काळही पूर्ण झालेला आहे.
या प्रवाशांना विलगीकरणाच्या कालावधीत करोनाची बाधा झालेली असल्यास किंवा त्यानंतर लक्षणे दिसून आल्याची शक्यता आहे. दक्षता म्हणून यांच्या पुन्हा चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे. यातील काहींच्या चाचण्या सोमवारी केल्या आहेत. आणखी काही प्रवाशांची यादी मंगळवारी मिळणार असून या प्रवाशांच्याही चाचण्या केल्या जातील, अशी माहिती पालिकेचे सहायक आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.