शिंदोडीत पहाटे घटना : शेतकरी भयभीत
निमोणे – शिरुर तालुक्यात दिवसेंदिवस बिबट्याची संख्या वाढत आहे. अनेक ठिकाणी बिबट्याचे दर्शन होत आहे. शिरुर तालुक्याच्या पूर्व भागातील शिंदोडी गावात (दि 20) पहाटे चारच्या सुमारास एक बिबट्याची मादी मच्छिंद्र सोनवणे यांच्या घरापुढे असणाऱ्या कोंबड्याच्या खुराड्यात शिरली. परंतु बिबट्या खुराड्यात शिरल्यानंतर कोंबडी बाहेर पळाली अन् शेतकऱ्याने खुराड्याच दार बंद केल्याने बिबट्याची मादी मात्र खुराड्यातच अडकली.
शिरुरच्या पूर्व भागात घोड धरणाच्या कडेला असणाऱ्या निमोणे, गुनाट आणि शिंदोडी बागायती शेती असल्यामुळे परिसरात मोठया प्रमाणात उसाचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे अनेकवेळा उसाच्या फडात बिबट्या लपून बसतो. परंतु शिकारीच्या शोधात बाहेर पडल्यानंतर अनेकवेळा शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन होते.
शिंदोडी येथील शेतकरी मच्छिद्र सोनवणे यांच्या घरासमोर कोंबड्याच खुराड असून पहाटे चारच्या सुमारास शिकारीच्या शोधात असलेली एक बिबटयाची मादी थेट कोंबड्याच्या खुराड्यात शिरली. त्यामुळे कोंबड्या आरडाओरडा करीत खुराड्याच्या बाहेर पळाल्या. कोंबड्याच्या आवाजाने जागे झालेले शेतकरी मछिंद्र सोनवणे हे खुराड्याजवळ गेले. त्यांना बिबटयाची मादी कोंबड्याच्या खुराड्यात शिरलेली दिसली. त्यांनी प्रसंगावधान राखत खुराड्याच दार बाहेरुन बंद केले. बिबटयाची मादी खुराड्यात अडकली.
सोनवणे यांनी शिंदोडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे संचालक विठ्ठल दुर्गे यांना माहिती घेतली. दुर्गे यांनी तातडीने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना संपर्क केला. जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारण केंद्राचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ चंदन चवणे तसेच सहकारी आकाश डोळस, वैभव नेहरकर, शिवाजी मोघे, शिरुरचे वनपाल गणेश म्हेत्रे, वनरक्षक संतोष भुतेकर, वनकर्मचारी दिनेश गोरड, नवनाथ गांधले, संपत पाचुंदकर हे शिंदोडी येथे आले.
यावेळी कोंबड्याच्या खुराड्यात अडकलेल्या बिबट्याच्या मादीला भुलीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले. तिला जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारण केंद्रात पाठविले. अंदाजे दोन वर्षांची ही मादी असल्याचे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
आधीच लोडशेडींग त्यात बिबट्याची भीती
सध्या कडक उन्हाळा असल्यामुळे मोठया प्रमाणात लोडशेडींग सुरू आहे. शेतकऱ्यांना रात्री अपरात्री पिकांना पाणी देण्यासाठी जावे लागते. त्यात बिबट्याची भीती आहे. शेतकरी सध्या जीव मुठीत धरुन शेतात जात असून शेतातील बिबटया भक्षाच्या शोधासाठी आता थेट दारात येऊ लागल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. कडक उन्हाळा असल्यामुळे अनेकजण घराच्या ओट्यावर तसेच पडवीत झोपतात. परंतु आता बिबट्या थेट घराच्या अंगणात येऊ लागला असल्याने घरात झोपावे तर उकाड्यामुळे हैराण आणि बाहेर झोपावं तर बिबट्यामुळे हैराण अशीच नागरिकांची अवस्था झाली आहे.