तळेगाव दाभाडे ( मनोहर दाभाडे ) – मावळ तालुक्यात यावर्षी रब्बीतील गहू, हरभरा, ज्वारी, मसूर, वाटाणा ही पिके चागंली जोमात आली आहेत. सध्या पडत असलेल्या कडाक्या थंडीमुळे ही पिके अधिकच तरारली आहेत. तर ढगाळ वातावरणामुळे ज्वारीच्या कणसात दाणे भरण्यासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पीके डोलू लागली असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
मावळ तालुका हा खरीपामध्ये भातपिकाचे आगार असला तरी तालुक्यात रब्बीतील गहू, हरभरा, ज्वारी, वाटणा, मसूर या सारखी पिके घेतली जातात. कमी कालावधीत येणाऱ्या पिकांची लागवड शेतकरी करत आहे. सध्या ज्वारीचा दर सात हजार रुपये क्विंटल असा आहे. त्यामुळे गोरगरिबांची भाकरी महाग झाली आहे. मावळ तालुक्याच्या पुर्व पट्यातील गावामध्ये यावर्षी रब्बी ज्वारीची पेरणी नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात झाली होती.
ज्वारीची काढणी झाल्यावर कडब्यासाठी उपयोगी पडणार असल्याने शेतकरी ज्वारीच्या पिकाला जपत आहेत. कांदा, हरभरा, गहू या पिकांना फवारल्याने व कडक थंडीमुळे ही पिके जोमात आली आहेत.त्याचवेळी ज्या भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. या पावसाचा ज्वारीच्या पिकाला अतिशय चागंलाच फायदा झाला आहे. नोव्हेंबर महिन्यात पेरलेली ज्वारी सध्या कणसात आलेली असून काही ठिकाणी दाणेही भरायला लागले आहेत.
भातकाढणीच्या काळात ज्या ठिकाणी अवकाळी पाऊस झाला होता. त्याठिकाणच्या रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारीच्या मसूर वाटाणा या पिकांच्या पेरण्या उशिरा झाल्या असल्याचे सहायक कृषी अधिकारी अक्षय ढुमणे यांनी सांगितले.
मावळ तालुक्यातील काही रब्बी ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांना शासनाकडुन रब्बी ज्वारीच्या बियाण्याचे वाटप करण्यात आले आहे. मावळ तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी सांगितले. तर नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात पडलेल्या पावसाने रब्बी ज्वारीचे पिक चांगलेच जोमात आलेले आहे असेही कृषी अधिकारी दत्तात्रय पडवळ यांनी सांगितले.
यावर्षी ज्वारीच पिक चांगले आल्याने मावळ तालुक्यातील रब्बीतील ज्वारी उत्पादक शेतकर्यामध्ये ‘रब्बी ज्वारी पिक स्पर्धा’ शासनाकडून आयोजित करण्यात आली आहे. जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी या स्पर्धेत भाग घ्यावा.
– दत्तात्रय पडवळ, मावळ तालुका कृषी अधिकारी