शिरगाव – महाराष्ट्रातील प्रत्येक गाव आदर्श होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. मावळ तालुक्यातीलही अनेक गावांची यादिशेने वाटचाल सुरू आहे. मात्र पुसाणे गावाने यामध्ये मोठी आघाडी घेतली आहे. अनेक सोयी-सुविधा ग्रामस्थांना दिल्यानंतर आता सौरउर्जेवर वीज निमिर्तीच्या दिशेने पाऊल टाकले आहे. दररोज 40 किलोवॅटची निमिर्तीमुळे पुसाणे गाव विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार आहे.
गेल्या पस्तीस वर्षांपासून पुसाणे गावातील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध होत आहे. गावात बंदिस्त सांडपाणी व्यवस्था असून शुध्द पाणी पुरवठ्यासाठी फिल्टर प्लॅटही आहे. एवढेच नव्हे तर डिजिटल शाळा, घरोघरी शौचालय, गावातील प्रत्येक रस्त्याचे कॉंक्रिटीकरण, अशा अनेक योजना राबवून आदर्श गावाकडे वाटचाल करण्यात आघाडी घेतली आहे. सौरउर्जेचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पुसाणे गाव देशातील पहिले सौरऊर्जा वापरणारे गाव ठरणार आहे.
केशवनगर, वडगाव मावळ या शहरी भागात विद्युत रोहित्र जळाल्यामुळे पाच दिवस येथील शेकडो कुटूांना अंधारात राहावे लागल्याचा प्रकार दै. “प्रभात’ने उघडकीस आणला. ग्रामीण भागातही विजेची समस्या पाचवीलाच पुजलेली असते. कधी कधी तर बारा तास वीज गाय असते. सण, उत्सव समारंभ, लग्न सोहळा, अखंड हरिनाम सप्ताह असो की अन्य कार्यक्रम. वीज पुरवठा कधी खंडीत होईल, हे सांगता येत नाही.
पावसाळ्याच्या दिवसात विजेचे खांब कोसळणे, रोहित्र नादुरुस्त होणे अशी समस्या येते. आठ-आठ दिवस गावामधून वीज गायब असते. यावर पर्याय म्हणून गामस्थांच्या प्रयत्नातून व एका नामांकित कंपनीच्या माध्यमातून पुसाणे गावामध्ये सोलर सिस्टीम प्रकल्प उभारण्यात आला आहे. त्यापासून रोजची चाळीस किलोवॅट वीजनिर्मिती होणार आहे. त्यामुळे गावातील पथदिवे, शाळा, ग्रामपंचायत कार्यालय, मंदीरे, गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या उपसा योजनेच्या मोटारीसाठी 24 तास वीज पुरवठा होणार आहे. भविष्यात संपुर्ण गावातील कुटुंबांना सुध्दा वीज पुरवठ्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
हा प्रकल्प उभारणीसाठी ग्रामस्थ पोपट वाजे, गोरख रावडे व गुलाब वाजे यांचेही सहकार्य लाभले. सोलर सिस्टीम यंत्रणा उभी करण्यासाठी नामांकित कंपनीने कोट्यवधी रुपये तर ग्रामस्थांनी 20 लाख रुपये खर्च केले आहेत. यामध्ये केवळ सोलर सिस्टीमच नाही तर बॅटरी आणि जनरेटर बॅकअप देखील या सोलर सिस्टीम प्रकल्पाला देण्यात आला आहे. यामुळे पावसाळ्याच्या दिवसात सुध्दा वीजपुरवठा सुरळीत राहणार आहे.
पुसाणे गावातील
घरांची – 200
पुसाणे गावची
लोकसंख्या – 1,500
प्रकल्पासाठी ग्रामस्थांनी दिलेले योगदान – 20 लाख
प्रकल्प पूर्ण होण्यासाठी लागलेला वेळ – 8 महिने