पिंपरी (प्रदीप लोखंडे ) – पिंपरी-चिंचवड महापालिकेने हॉकी महाराष्ट्र सोबत करार करत मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमचा ताबा त्यांच्याकडे दिला. तेव्हापासून पिंपरी-चिंचवड शहरातील स्थानिक हॉकी खेळाडूंना सरावाला मैदानात प्रवेश दिला जात नाही. स्पर्धेसाठी देखील पैसे मोजावे लागत आहेत. मैदानाअभावी शहरातील सर्वसामान्य खेळाडूंचा सराव देखील बंद झाला आहे. महापालिकेच्या या धोरणामुळे शहरात हॉकीपटू घडणार कसे, असा संतापजनक प्रश्न खेळाडू उपस्थित करत आहेत.
शहरातून दर्जेदार आणि राष्ट्रीय हॉकीपट्टू घडावेत यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने नेहरूनगर येथे सुसज्ज मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियम उभारले आहे. शहरातील सर्वसामान्य घरातील विद्यार्थी या ठिकाणी दररोज सराव करत होते. अनेक खेळाडूंनी विविध स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत नावही कमावले आहे. मात्र गेल्या आठ महिन्यांपासून हॉकीचे मैदान स्थानिक खेळाडूंसाठी उपलब्ध करुन दिले जात नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. महापालिकेने हॉकी महाराष्ट्रसोबत करार करून दहा वर्षांसाठी हे मैदान त्यांच्या ताब्यात दिले आहे. त्या बदल्यात शहरातील 60 टक्के खेळाडूंना सराव मार्गदर्शन करण्याची अट घालण्यात आली आहे.
हॉकी महाराष्ट्रच्या ताब्यात मैदान गेल्यापासून इतर स्पर्धा घेण्यासाठी पैसे मोजावे लागत आहे. तसेच स्थनिक खेळाडुंना दैनंदिन सराव देखील करु दिला जात नाही. किमान दोन तास तरी मोफत सरावासाठी मैदान उपलब्ध करुन देण्याची मागणी स्थानिक खेळाडू करत आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या क्रीडा प्रबोधिनीतील 50 खेळाडू रोज सराव करत आहेत. तसेच बुकींग करून स्पर्धेसाठी मैदान उपलब्ध करून दिले जात आहे. दररोज सराव करण्याबाबतचे पत्र खेळाडूंनी दिले आहे. ते आयुक्तांना दिले असून त्यांच्याकडून मान्यता आल्यास पुढील कार्यवाही करण्यात येईल.
– अनिता केदारीे, क्रीडा अधिकारी, पिंपरी-चिंचवड महापालिका.
शहरातील खेळाडुंना संधी का नाही?
शहरातील 60 टक्के खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची अट घातली आहे. मात्र तेवढ्या खेळाडूंना फायदा होतो का, मार्गदर्शन केले जाते का, याची तपासणी केली जात नसल्याचे शहरातील खेळाडू सांगत आहेत. तसेच नुकत्याच झालेल्या मिनी ऑलम्पिक व इतर स्पर्धेमध्ये शहरातील हॉकीपट्टू का नाहीत, असा प्रश्नही शहरातील खेळाडू उपस्थित करत आहेत. तर मैदानावर महापालिकेच्या शाळातील विद्यार्थी सराव करत असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात येत आहे. तसेच बुकींग करून स्पर्धेसाठी मैदाने देत असल्याचे सांगण्यात येत आहे.