सासवड (प्रतिनिधी) – पुरंदर तालुक्यातील मांढर येथील करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या भावाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. पुरंदर तालुक्यात करोना रुग्णांच्या संख्येत एकने वाढ झाली असून एकूण संख्या सहा झाली आहे.
मांढर येथील एका वृद्धाचा त्यांच्या जुन्या आजाराने सोमवारी (दि. 2) मृत्यू झाला होता. ते मांढर येथील एक मंदिराचे सेवक होते. ते शासकीय रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांना करोनाची लक्षणे दिसल्याने त्यांची करोना टेस्टसाठी स्वॅब घेतला होता. पण उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. त्यामुळे पुरंदर तालुक्यात पहिला करोना रुग्ण मृत झाल्याचे स्पष्ट झाले होते.
मृत व्यक्तीचा करोना रिपोर्ट प्रलंबित होता दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांचा रिपोर्ट पुरंदरच्या प्रशासनाने पॉझिटिव्ह असल्याचे जाहीर केले आणि पुरंदरकरांना धक्का बसला होता. या वृद्ध व्यक्तीचा करोना रिपोर्ट प्रलंबित असताना त्यांचे शव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले होते. त्यामुळे गावातील किंवा नातेवाइकांना संसर्ग होण्याची भिती व्यक्त करण्यात येत होती. गावातील व जवळच्या नातेवाईकांनी यासंदर्भात खबरदारी घेतली होती. तरी त्या वृद्ध व्यक्तीचा संपर्कात आलेल्या त्यांच्या चुलत भावाचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.