पिंपरी (प्रतिनिधी) – सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयातून करोनामुक्त झाल्याने शुक्रवारी (दि. 5) दोघांना घरी सोडण्यात आले. पुण्यातील गोखलेनगर आणि पर्वती दर्शन भागातील ते रहिवाशी आहेत.
पर्वती दर्शन येथील 45 वर्षीय महिला आणि गोखलेनगर येथील 44 वर्षीय महिलेचा त्यामध्ये समावेश आहे. दोघांवर रुग्णालयात 14 दिवस उपचार केल्यानंतर घेण्यात आलेल्या सलग दोन करोना चाचण्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. त्यामुळे त्यांना आज घरी सोडण्यात आले.
दरम्यान, आज चार संशयित रुग्णांच्या करोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामध्ये बोपोडी येथील दोघे तर, जुनी सांगवी आणि वाकड येथील प्रत्येकी एका पुरुषाचा समावेश आहे. 5 करोना संशयित रुग्णांना आज उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण परिसरातील हे रुग्ण आहेत. रुग्णालयामध्ये सध्या 26 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 5 जणांची प्रकृती चिंताजनक आहे.