पुरंदर विमानतळ : हद्दीचे नकाशे जाहीर

हरकती नोंदविण्यासाठी 16 दिवसांचा अवधी

पुणे – पुरंदर येथे उभारण्यात येणाऱ्या “छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळा’साठीचे अधिसूचित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहे. या क्षेत्राचा विकास आराखडा तयार करण्याचा उद्देश महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने जाहीर केला आहे. त्यानुसार पारगाव, खानवडी, मुंजवडी, एखतपूर, कुंभारवळण, वनपुरी आणि उदाची वाडी या गावातील हद्दीचे नकाशे जाहीर करण्यात आले आहेत. त्यावर नागरिकांना दि. 25 जुलैपर्यंत हरकती-सूचना नोंदविता येणार आहे.

महाराष्ट्र प्रादेशिक आणि नगररचना नियोजन कायदा 1966 च्या तरतुदीनुसार उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी यांना विकास योजना तयार करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून हद्दीची अधिसूचना दि. 25 मे रोजी प्रसिद्ध करण्यात आली. यानुसार हरकती नोंदविण्यासाठी 60 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या 7 गावांतील विमानतळासाठी किती क्षेत्र संपादित करावे लागणार आहे. कोणत्या गावातील जमिनी यामध्ये जाणार आहेत. याची सर्व्हे नंबर निहाय माहिती या नकाशांमध्ये देण्यात आली आहे. पुरंदर येथे विमानतळ उभारण्यासाठी सुमारे 2 हजार 832 हेक्‍टर जागा लागणार आहे. यापैकी 2 हजार हेक्‍टरवर प्रत्यक्षात विमानतळ उभारण्यात येणार आहे.

याठिकाणी नोंदविता येणार हरकती
पुरंदर विमानतळासाठीच्या सूचना व हरकती नागरिकांना नोंदविता येणार आहेत. मुख्य नियोजनकार महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी, आठवा मजला, वर्ल्ड, ट्रेड सेंटर, कफ परेड मुंबई -5 येथील कार्यालयात हरकती देता येणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.