पुणे – राज्य सरकारने प्रभाग रचना करण्याचे नव्याने आदेश दिले आहेत. पण, त्यामुळे महापालिका प्रशासनापुढे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामध्ये जुन्या प्रभाग रचनेचे काय? नवी रचना एक सदस्यीय की बहुसदस्यीय, त्याची सादर करण्याची मुदत काय, लोकसंख्येनुसार ती होणार का? हे प्रश्न उपस्थित झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी तीनसदस्यीय रचना करण्यात आली होती. त्यावेळी हे सर्व प्रश्न उपस्थित झाले होते. आता पुन्हा तेच प्रश्न निर्माण झाले आहेत.
निवडणुका होणार कधी?
शक्यता क्र. 1
निवडणुका कधी? हे उच्च न्यायालयाच्या निर्णयावर ठरणार आहे. यामध्ये न्यायालयाने जर सरकारविरोधात निकाल दिला, तर प्रारूप रचनेवरची प्रलंबित प्रक्रिया पूर्ण करून मान्यतेसाठी ते राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवले जाईल. त्याला मान्यता देऊन जूनपर्यंत निवडणुका होण्याची शक्यता आहे.
शक्यता क्र. 2
न्यायालयाने राज्य सरकारच्या बाजूने निकाला दिला, तर नव्याने प्रारूप प्रभाग रचना तयार करणे, त्यावर हरकती-सूचना मागवून सुनावणी प्रक्रिया पूर्ण करून अंतिम मान्यतेसाठी ती राज्य सरकारकडे सादर करणे याला किमान दोन महिन्यांचा कालावधी लागू शकतो. त्यानुसार दिवाळीदरम्यान निवडणुका होऊ शकतील.