मनपाच्या कलावती मावळे दवाखान्यातील प्रकार
पुणे – बुधवारपासून सुरू झालेल्या 18 ते 44 वयोगटातील लसीकरण मोहिमेला पहिल्याच दिवशी गालबोट लागले. सकाळी 7 वाजेपासून केंद्रावर थांबलेल्या नागरिकांना हुसकावून लावत, एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांना लस देण्यात आली. हा प्रकार नारायण पेठेतील कलावती मावळे दवाखान्यात घडला आहे. या प्रकारानंतर संतप्त नागरिकांनी गोंधळ घालत आरोग्य विभागाकडे तक्रार केली.
मावळे दवाखाना लसीकरण केंद्रावर नागरिक सकाळी सातपासूनच रांगेत थांबले होते. मात्र, बुधवारी सकाळी लसीकरण सुरू झाल्यानंतर “वॉक इनद्वारे आलेल्या नागरिकांना केवळ 30 टक्के लस असून रांगेतील 30 जणांनीच थांबावे,’ अशा सूचना देत इतरांना परत पाठवण्यात आले. त्यानंतर काही वेळात काही तरुण घोळक्याने लसीकरण केंद्रात गेले आणि लस घेऊन बाहेर येऊ लागले, तर थांबवण्यात आलेल्या काही नागरिकांना लस संपल्याचे सांगण्यात आले.
मात्र, येऊन लस घेऊन जाणारे तरुण वारंवार दिसतच होते. त्यामुळे 30 टक्केनागरिकांना थांबवूनही लस न दिलेल्या नागरिकांनी या तरुणांबाबत आक्षेप घेत गोंधळ घातला. मात्र, त्या ठिकाणी असलेल्या डॉक्टर तसेच कर्मचाऱ्यांनी नागरिकांना उडवाउडवीची उत्तरे देत हुसकावून लावले. तसेच “4 वाजता या लस शिल्लक असेल तर देऊ’ असे सांगण्यात आले.
त्यामुळे या प्रकाराबाबत काही नागरिकांनी कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय अधिकारी आशिष महाडदळकर यांच्याकडे तक्रार करण्यात आली. त्यानंतर त्यांनी तातडीने ही बाब आरोग्य अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतरही नागरिकांना लस देण्यात आली नाही. त्यामुळे या केंद्रावरील डॉक्टर व इतर स्टाफला कारणे दाखवा नोटीस बजावून झाल्याप्रकरणी खुलासा मागवण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.