पुणे – प्रवासी विमानांच्या मालवाहतूक सेवेसाठी लोहगाव विमानतळ येथे अडीच एकर जागेचे विमानतळ प्रशासनाकडे हस्तांतरण करण्यासाठी भारतीय हवाईदलाने मंजुरी दिली असल्याची माहिती विमानतळ सल्लागार समितीतील वरिष्ठांनी दिली आहे. यामुळे विमानतळ परिसरात मालवाहतूकविषयक समस्या सोडविण्यास हातभार लागणार आहे.
वाढती विमान वाहतूक आणि गेल्या दीड वर्षांपासून लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सातत्याने विविध वैद्यकीय संसाधनांची वाहतूक करण्यासाठी पुणे विमानतळाचा वापर वाढला आहे. त्यातच येथून होणारी मालवाहतूक आणि लसपुरवठा यामुळे मालवाहतूक सेवेसाठी अधिक जागेची आवश्यकता भासू लागली आहे.
पुणे विमानतळ प्रशासनाने तीन वर्षांपूर्वीच हवाईदलाची जागा हस्तांतरित करण्याबाबतचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाकडे पाठवला होता. मात्र, त्याबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही ठोस प्रतिसाद मिळत नसल्याने विमानतळ प्रशासनाच्या अडचणीत वाढ झाली होती.
शेती आणि व्यवसाय संबंधित मालवाहतुकीचा जलद आणि सुरळीत पुरवठा करण्यासाठी वस्तू साठवणीच्या जागेत वाढ करण्याची गरज विमानतळ सल्लागार समितीच्या बैठकीत सातत्याने व्यक्त करण्यात येत होती.