तिसऱ्या लाटेसाठी पालिकेकडून तयारी
पुणे – सीओईपी मैदानावरील जम्बो रुग्णालयाच्या स्ट्रक्चरचे पुन्हा एकदा दिल्ली आयआयटी आणि सीओईपीकडून ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ही माहिती मनपा अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी दिली. दरम्यान, जम्बोत सध्या 25 रुग्ण असल्याने पालिकेने 30 जूनपर्यंत हे रग्णालय सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
करोनाच्या पहिल्या लाटेत ऑगस्ट 2020 मध्ये हे रुग्णालय महापालिकेने सुरू केले होते. त्यावेळी या सुमारे 600 बेड्स तसेच 200 ऑक्सिजन बेडची सुविधा होती. पुढे डिसेंबर 2020 मध्ये हे हॉस्पिटल बंद करून स्ट्रक्चर कायम ठेवण्यात आले.
फेब्रुवारी 2021 मध्ये करोनाची दुसरी लाट सुरू झाल्यानंतर महापालिकेने मार्चमध्ये जम्बो हॉस्पिटल सुरू केले. त्यात 700 ऑक्सिजन बेड्स उपलब्ध करण्यात आले. जवळपास तीन महिन्यांत या रुग्णालयात साडेतीन हजारांवर रुग्णांनी उपचार घेतले.
आता मेपासून करोनाची लाट ओसरण्यास सुरुवात झाली आहे. तर आता जम्बोमध्ये सध्या 25 रुग्ण आहेत. त्यांना 30 जूनपर्यंत डिस्चार्ज मिळेल. त्यामुळे पालिकेने त्या दिवसापासूनच “जम्बो’ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
डेल्टा प्लसने धडकी
राज्यात आता करोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळत आहेत. विषाणूच्या या उत्परिवर्तनामुळे तिसरी लाट महिनाभरातच येण्याचा धोका आहे, तर जम्बोचे सध्याचे स्ट्रक्चर 15 जुलैपर्यंतच वापरणे शक्य आहे. त्यामुळे तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन, या स्ट्रक्चरचे पुन्हा सुरक्षा ऑडिट करण्याच्या सूचना संबंधित कंपनीस दिल्या आहेत.